सीरमने बनविली पहिली स्वदेशी न्यूमोनिया लस, येत्या आठवड्यापासून उपलब्ध होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 05:51 AM2020-12-26T05:51:10+5:302020-12-26T06:48:02+5:30
pneumonia vaccine : फायझर व ग्लॅक्सोस्मिथक्लाइन या विदेशी कंपन्यांनी न्यूमोनियावर बनविलेल्या लसी सध्या बाजारात उपलब्ध असून त्यापेक्षा सीरमच्या लसीची किंमत खूपच कमी आहे.
नवी दिल्ली : न्यूमोनिया तापाविरोधात सीरम इन्स्टिट्यूटने बनविलेली पहिली स्वदेशी बनावटीची लस येत्या आठवड्यापासून उपलब्ध होणार आहे. भारतामध्ये न्यूमोनियामुळे अर्भके मरण पावण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यांच्यासाठी सीरमची स्वदेशी लस वरदान ठरणार आहे.
ही लस उपलब्ध करून देण्याचा समारंभ केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते पार पडेल. यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, फायझर व ग्लॅक्सोस्मिथक्लाइन या विदेशी कंपन्यांनी न्यूमोनियावर बनविलेल्या लसी सध्या बाजारात उपलब्ध असून त्यापेक्षा सीरमच्या लसीची किंमत खूपच कमी आहे.
सीरम इन्स्टिट्यूटने बनविलेल्या न्यूमोनियावरील स्वदेशी लसीची बाजारपेठेत विक्री करण्यास औषध महानियंत्रकांनी जुलैमध्ये परवानगी दिली होती. या लसीच्या मानवी चाचण्यांचे तीन टप्पे सीरम इन्स्टिट्यूटने भारत तसेच आफ्रिकेतील गाम्बिया या देशात पार पडले होते.
आत्मनिर्भर भारतासाठी...
सीरम इन्स्टिट्यूटने यासंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आत्मनिर्भर भारताच्या निर्माणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट आपल्या परीने हातभार लावत आहे. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून न्यूमोनियाला प्रतिबंध करणारी स्वदेशी लस आम्ही तयार केली.