पहिली ‘किसान रेल’ आज देवळालीहून रवाना होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 01:44 AM2020-08-07T01:44:47+5:302020-08-07T01:45:15+5:30
खासगी भागीदारीने विशेष सेवा : भाजी, फळांच्या वाहतुकीची ‘एसी’; घोषणा झाली होती अर्थसंकल्प मांडताना
नवी दिल्ली : भाजीपाला, फळे यासारख्या नाशिवंत मालाच्या जलदगतीने वाहतुकीसाठी रेल्वेची ‘किसान रेल’ ही विशेष सेवा शुक्रवारपासून सुरू होत असून अशी पहिली गाडी नाशिक जिल्ह्यातील देवळाली येथून बिहारमधील दानापूरकडे रवाना होईल. नाशिवंत मालाच्या पूर्णपणे वातानुकुलित वाहतुकीसाठी खासगी उद्योगांच्या भागिदारीने अशी विशेष रेल्वे सुरु करण्याची घोषणा वित्तमंत्री निर्मला सितारामन यांनी यंदाचा अर्थसंंकल्प मांडताना केली होती. या रेल्वेने शेतकऱ्यांच्या शेतापासून बाजारपेठेपर्यंत विनाखंड वातानुकुलित वातावरणात मालाची वाहतूक करण्याची सोय उपलब्ध होईल. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर व रेल्वेमंत्री पियुष गोयल दिल्लीतील ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ने या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना
करतील.
भारतीय रेल्वेने ही माहिती देताना एका निवेदनात म्हटले की, पहिली ‘किसान रेल’ गाडी ७ आॅगस्ट रोजी देवळाली येथून सकाळी ११ वाजता रवाना होईल व १,५१९ किमीचे अंतर ३१ तास ४५ मिनिटांत कापून शनिवारी (८ आॅगस्ट) सायंकाळी ६.४५ वाजता पोहोचेल. ही ‘किसान रेल’ गाडी आठवड्यातून एक दिवस चालविली जाईल. वाटेत ती नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, बुºहाणपूर, खांडवा, इटारसी, जबलपूर, सतना, कटनी, माणिकपूर, प्रयागराज छेवकी, पं. दीनदयाल उपाध्याय नगर व बक्सर येथे थांबून दानापूरला जाईल.
मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग हा प्रामुख्याने शेतीप्रधान भाग आहे.
नाशिक जिल्हा आणि परिसरात ताज्या भाज्या, फळे, फुले, कांदे व अन्य नाशिवंत मालाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. किंबहुना हा परिसर ‘किचन गार्डन’ म्हणूनच ओळखला जातो. हा माल महाराष्ट्रातील अन्य शहरांखेरीज अन्य राज्यांमध्ये पाटणा, अलाहाबाद, कटनी, सतना इत्यादी ठिकाणी पाठविला जातो.
या गाडीने माल पाठविण्यासाठी प्रतिटन मालभाडे आकारणी अशी असेल: नाशिक रोड/ देवळाली ते दानापूर-रु. ४,००१. मनमाड ते दानापूर-रु. ३,८४९. जळगाव-दानापूर-रु. ३,५१५ आणि भुसावळ ते दानापूर-रु. ३,४४९.
दशकापूर्वीची कल्पना
च्नेहमीच्या मालगाड्यांना ‘रेफ्रिडरेटेड पार्सल व्हॅन’ जोडून त्यातून नाशिवंत मालाची अशा प्रकारे वाहतूक करण्याची पहिली कल्पना माजी रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी सन २००९-१० च्या रेल्वे अर्थसंंकल्पात मांडली होती; पण ती कधी प्रत्यक्षात उतरलीच नाही. याआधी रेल्वने केळ्यासारख्या एकाच नाशवंत वस्तूच्या वाहतुकीसाठी विशेष मालगाड्या चालविल्या होत्या.
च्विविध प्रकारच्या नाशवंत मालांसाठी एकत्रित अशी गाडी प्रथमच चालविण्यात येत आहे. याशिवाय ‘कन्टेनर कॉर्पोरेशन आॅफ इंडिया’च्या (सीसीआय) ‘सीएसआर’ निधीतून रेल्वेने उत्तर प्रदेशात गाझीपूर घाट व राजा का तालाब आणि दिल्लीत न्यू आझादपूर येथे नाशवंत मालासाठी तापमान नियंत्रित केलेली ‘कार्गो सेंटर’ सुरु केली. नशिक जिल्ह्यात लासलगाव येथेही अशीच एक योजना प्रगतिपथावर आहे.