भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 02:09 AM2019-03-16T02:09:46+5:302019-03-16T02:10:01+5:30
पुण्यातून गिरीश बापट यांच्या नावाची चर्चा
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : भाजपा शनिवारी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या १०० ते १३० उमेदवारांचीपहिली यादी जाहीर करू शकते. शनिवारी पक्षाच्या केंद्रीय निवड समितीची बैठक होईल व त्यानंतर ही यादी जाहीर केली जाईल.
पक्ष सूत्रांनुसार निवड समितीच्या बैठकीत पहिल्या टप्प्यात असलेल्या ९१ जागांवरील उमेदवारांची नावे निश्चित केली जातील. त्यात महाराष्ट्रातील सात, उत्तर प्रदेश ८, आंध्र प्रदेश २५ आणि तेलंगणच्या १७ जागांचा समावेश आहे. ११ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठीच्या जागांसाठी १८ मार्च रोजी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. पहिल्या यादीत बिहार, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगालमधील अनेक उमेदवारांची नावे असतील, असे सांगितले जाते.
भाजपाच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील नितीन गडकरी (नागपूर), हंसराज अहिर (चंद्रपूर), रावसाहेब दानवे (जालना) यांची नावे निश्चित समजली जात आहेत. याशिवाय गिरीश बापट (पुणे), संजय धोत्रे (अकोला), कपिल पाटील (भिवंडी), अशोक नेते (गडचिरोली) आणि सुनील मंडे (भंडारा) यांना निश्चित तिकीट मिळेल, असे मानले जाते. लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर भाजपाच्या निवडणूक समितीची ही पहिली बैठक असेल. पक्षाच्या येथील मुख्यालयात होणाऱ्या या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा, सुषमा स्वराज आदी उपस्थित राहतील.