भाजप संसदीय पक्षाची उद्या पहिली बैठक, नव्या सरकारच्या अजेंड्याची अपेक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 04:51 AM2019-07-01T04:51:18+5:302019-07-01T04:51:39+5:30
नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला जाण्याखेरीज अनेक महत्त्वाची विधेयकेही मंजुरीसाठी असल्याने हे अधिवेशन महत्वाचे आहे.
नवी दिल्ली: १७ व्या लोकसभेच्या सध्या सुरू असलेल्या पहिल्या अधिवेशनातील भाजप संसदीय पक्षाची पहिली बैठक मंगळवारी होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाच्या ३८० संसद सदस्यांपुढे नव्या सरकारचा ‘अजेंडा’ मांडतील, अशी अपेक्षा आहे.
नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला जाण्याखेरीज अनेक महत्त्वाची विधेयकेही मंजुरीसाठी असल्याने हे अधिवेशन महत्वाचे आहे. मंगळवारच्या बैठकीची नेमकी विषयपत्रिका समजली नसली तरी प्रथेप्रमाणे महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेहून परत आल्यानंतर मोदींचे बैठकीत अभिनंदन केले जाणे अपेक्षित आहे.
लालकृष्ण अडवाणी व डॉ. मुरली मनोहर जोशी या ज्येष्ठ नेत्यांशिवाय होणारी अनेक दशकांतील ही पहिलीच बैठक असेल. आधी ही बैठक २५ जून रोजी व्हायची होती. परंतु राजस्थान भाजपाचे अध्यक्ष व राज्यसभा सदस्य मदन लाल सैनी यांच्या निधनामुळे ती रद्द करण्यात आली होती.