योगी सरकारमधून पहिल्या मंत्र्याचा राजीनामा, गंभीर आरोप; थेट अमित शहांकडे पाठविला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 01:43 PM2022-07-20T13:43:47+5:302022-07-20T13:44:42+5:30
UP Minister resigned: दलित असल्याने अधिकाऱ्यांकडून योग्य मान सन्मान मिळत नसल्याचा गंभीर आरोप खटीक यांनी केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राजभवनाला देखील राजीनाम्याची प्रत पाठविल्याचे सांगितले जात आहे.
योगी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये मोठी अस्वस्थता असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. तीन मंत्री राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात होते. यावर पहिल्या मंत्र्याचा राजीनामा आला आहे. जलसंपदा मंत्री दिनेश खटीक यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनाच राजीनामा पाठविल्याने युपीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
दलित असल्याने अधिकाऱ्यांकडून योग्य मान सन्मान मिळत नसल्याचा गंभीर आरोप खटीक यांनी केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राजभवनाला देखील राजीनाम्याची प्रत पाठविल्याचे सांगितले जात आहे. खटीक हे जलसंपदा खात्याचे राज्यमंत्री आहेत.
मंत्री असून देखील आपल्याला बैठकांचे निमंत्रण दिले जात नाही. तसेच आपल्यासोबत बैठकाही घेतल्या जात नाहीत. फक्त गाडी देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप खटीक यांनी केला आहे. याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती मागविली तर ती देखील देण्यात आलेली नाही. मुख्य सचिवांनी तर फोनही कट केला. नमामी गंगे योजनेमध्ये देखील मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खटीक यांनी अमित शहांना लिहिलेल्या पत्रात आतापर्यंत राज्यमंत्री म्हणून कोणतेच काम मिळाले नसल्याची तक्रार केली आहे. मी दिलेल्या कोणत्याही आदेशावर कार्यवाही करण्यात आलेली नाही, तसेच विभागाच्या योजनांची माहिती देखील देण्यात येत नाही, असे आरोप केले आहेत. पक्षाकडून अद्याप खटीक यांच्या राजीनाम्याबाबत खुलासा करण्यात आलेला नाही. तसेच राजीनामा देखील स्वीकारण्यात आलेला नाही.