2017 मधील पहिले चंद्रग्रहण दिसणार उद्या पहाटे
By admin | Published: February 10, 2017 02:59 PM2017-02-10T14:59:43+5:302017-02-10T15:06:24+5:30
वर्ष 2017 मधील पहिले चंद्रग्रहण 11 फेब्रुवारी म्हणजे शनिवारपासून पहाटे 4 वाजल्यापासून सुरू होणार आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - वर्ष 2017 मधील पहिले चंद्रग्रहण 11 फेब्रुवारी म्हणजे शनिवारपासून पहाटे 4 वाजल्यापासून सुरू होणार आहे. तसं पाहायला गेले तर ही खगोल शास्त्रीय घटना आहे, मात्र काही जण ज्योतिष आणि धर्मानुसारही या घटनेकडे पाहतात. यानुसार ग्रहण सुरू होणे अशुभ मानले जाते. दरम्यान, वर्षाचे पहिले चंद्र ग्रहण उपछाया चंद्रग्रहण आहे, याचा विशेष काही परिणाम होणार नाही. विरळ सावलीतून जेव्हा चंद्र जात असतो तेव्हा जे ग्रहण होते त्यास छायाकल्प चंद्रग्रहण असे म्हणतात.
11 फेब्रुवारीला सुरू होणारे उपछाया चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे शक्य नाही. मात्र टेलिस्कॉप किंवा दुर्बिणीच्या माध्यमातून हे ग्रहण पाहणं शक्य आहे.
11 फेब्रुवारीला भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे 4 वाजून 4 मिनिटांनी ग्रहणाचा स्पर्श होईल आणि सकाळी 8 वाजून 23 मिनिटांनी ग्रहण मोक्ष होईल. तर 26 फेब्रुवारी रोजी सूर्य ग्रहणदेखील असणार आहे.
कुठे कुठे पाहायला मिळेल चंद्र ग्रहण?
भारतासह जपान सोडून संपूर्ण आशिया खंड, युरोप, आफ्रिका, उत्तर आणि दक्षिण अमेरिका या प्रदेशांमध्ये हे ग्रहण दिसणार आहे.
वर्षांत किती ग्रहणे होतात?
वर्षांतून सात ग्रहणे होतात; त्यात 4 सूर्य ग्रहणे, तर 3 चंद्रग्रहणे किंवा 5 सूर्य ग्रहणे व 2 चंद्र ग्रहणे यांचा समावेश असतो. एका वर्षांत किमान 2 ग्रहणे होतात पण ती सूर्य ग्रहणेच असतात.
चंद्र ग्रहणाबाबतची माहिती
जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. चंद्रग्रहण ही एक पूर्णत वैज्ञानिक खगोलीय घटना आहे. चंद्रग्रहण साधारणपणे पौर्णिमेच्या आसपास दिसते. चंद्र ग्रहण प्रत्येक पौर्णिमेस लागत नाही, कारण चंद्रकक्षा व क्रांतिवृत समपातळीत नसून त्यांच्या पातळयांमध्ये ५ अंशांचा ९' चा कोन आहे.
सूर्यप्रकाशामुळे पडणारी पृथ्वीची सावली प्रछाया व उपछाया अशी दोन प्रकारची असते. प्रछाया सावलीच्या मध्यभागी व उपछाया प्रछायेच्या भोवती असते. प्रछायेत सूर्यकिरणे अजिबात नसतात. उपछायेत मात्र सूर्यकिरण सूर्याच्या एका भागातून येतात.
चंद्र परिभाषांतरांवरूनरमण करत प्रथम उपछायेत येतो. त्यावेळी चंद्रप्रकाश कमी होतो. यालाच ग्रहणाचे वेध लागले असे म्हणतात.
त्यानंतर चंद्र प्रछायेत येतो तेव्हा चंद्राचा भाग झाकाळलेला दिसतो. तेव्हा चंद्र ग्रहण लागले असे म्हणतात.
कालांतराने चंद्र प्रछायेतून बाहेर पडतो व पुन्हा प्रकाशित होतो. तेव्हा ग्रहण सुटले असे म्हणतात. त्यानंतर काही काळ चंद्र उपछायेत असतो तेव्हा त्याचा प्रकाश कमी असतो.
काही वेळाने जेव्हा चंद्र उपछायेतून बाहेर पडतो तेव्हा पौर्णिमेचा चंद्र नेहमीसारखा प्रकाशमान होतो. चंद्रग्रहणे पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यामुळे दिसतात.