रामायणावरील परीक्षेत मुस्लिम विद्यार्थिनी प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2016 03:43 AM2016-02-13T03:43:58+5:302016-02-13T03:43:58+5:30
देशात वाढत्या असहिष्णुतेबाबत चिंता व्यक्त होत असतानाच कर्नाटकात नववीत शिकणाऱ्या १३ वर्षांच्या मुस्लिम विद्यार्थिनीने धार्मिक सहिष्णुतेचा नवा आदर्श घालून दिला आहे.
मंगळुरू : देशात वाढत्या असहिष्णुतेबाबत चिंता व्यक्त होत असतानाच कर्नाटकात नववीत शिकणाऱ्या १३ वर्षांच्या मुस्लिम विद्यार्थिनीने धार्मिक सहिष्णुतेचा नवा आदर्श घालून दिला आहे. मंगळुरू जिल्ह्याच्या पुत्तूर तालुक्यातील फातिमा राहिलाने रामायणावरील परीक्षेत ९३ टक्के गुण पटकावले आहेत.
भारत संस्कृती प्रतिष्ठानतर्फे नोव्हेंबर २०१५ मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. रामायण आणि महाभारतावर आधारित अभ्यासक्रम करण्याची फातिमाची मनापासून इच्छा होती. तिच्या काकांनी तिला साथ दिल्याने हे शक्य होऊ शकले, असे उद्गार फतिमाचे वडील इब्राहीम यांनी काढले. ते कारखान्यात काम करतात, तर आई गृहिणी आहे. रामायणावरील परीक्षेत मिळालेल्या यशानंतर फातिमाला आता महाभारताची परीक्षा द्यायची आहे.
गेल्या वर्षी मुंबईतील मरियम आसीफ सिद्दीकी या १२ वर्षीय मुलीने भगवद्गीता स्पर्धेत अव्वल स्थान पटकाविले होते. (वृत्तसंस्था)
विद्यार्थी स्वेच्छेने आणि स्वत:च संपूर्ण अभ्यास करून या परीक्षेला बसतात. परीक्षेसाठी कुणावरही दबाव आणला जात नाही, असे शाळेचे मुख्याध्यापक शिवराम एचडी आणि परीक्षेचे समन्वयक पी. सत्यशंकर भट यांनी सांगितले. ती शिकत असलेल्या शाळेतून यंदा ३९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. फतिमा तालुक्यातून पहिली आली.