Coronavirus: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मोदी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 04:43 PM2020-03-25T16:43:23+5:302020-03-25T17:00:32+5:30
जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातलं काम अनिश्चित काळासाठी स्थगित
नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल रात्री केली. त्यानंतर आज मोदी सरकारनं कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जनगणनेचा पहिल्या टप्पा आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अपडेट करण्याचं काम पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं याबद्दलची माहिती दिली आहे.
In view of #COVID19 outbreak, the first phase of Census 2021 and the updation of National Population Register (NPR) postponed until further orders: Ministry of Home Affairs pic.twitter.com/Gv9ZZhf1KR
— ANI (@ANI) March 25, 2020
कोरोनाच्या संकटाची तीव्रता दिवसागणिक वाढतच असल्यानं राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी म्हणजेच एनपीआर अपडेट करण्याची प्रक्रिया अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. अनेक राज्यांमध्ये एनपीआरची प्रक्रिया १ एप्रिलपासून सुरू केली जाणार होती. मात्र कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता ही प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत एनपीआर अपडेट करण्याची प्रक्रिया स्थगित केली जात असल्याची माहिती गृह मंत्रालयानं दिली आहे.
२०२१ मध्ये होणारी जनगणना दोन टप्प्यांत केली जाणार असल्याचं सरकारकडून जाहीर करण्यात आलं होतं. या अंतर्गत एप्रिल २०२० ते सप्टेंबर २०२० दरम्यान जनगणना प्रक्रियेत सहभागी झालेले कर्मचारी घरोघरी जाऊन मोजणीचं काम करणार होते. एनपीआर अपडेट करण्याचं काम पहिल्याचं टप्प्यात केलं जाणार होतं. मात्र कोरोनाचा धोका लक्षात घेता सध्या ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.