'या' गावाने ७० वर्षात नोंदवली पहिली पोलिस तक्रार
By Admin | Published: May 9, 2016 12:33 PM2016-05-09T12:33:28+5:302016-05-09T12:33:28+5:30
देशातील कुठल्याही गाव, तालुक्यामध्ये काही दिवस किंवा महिन्याच्या अंतराने पोलिस स्थानकात विविध प्रकरणांमध्ये तक्रारी दाखल होत असतात.
ऑनलाइन लोकमत
लातेहार, दि. ९ - देशातील कुठल्याही गाव, तालुक्यामध्ये काही दिवस किंवा महिन्याच्या अंतराने पोलिस स्थानकात विविध प्रकरणांमध्ये तक्रारी दाखल होत असतात. गुन्हेगारी मुक्त गाव किंवा तालुका फार दुर्मिळ असतो. झारखंडमधील लालगडही हे असेच गुन्हेगारीपासून कोसो दूर असलेले गाव.
या गावातून १९४७ साली पोलिसात शेवटची तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर एक मे रोजी रविवारी तब्बल ७० वर्षानंतर या गावातून पहिली पोलिस तक्रार दाखल झाली. या गावातील एका विवाहीत पुरुष दुस-या महिलेबरोबर पळून गेल्या प्रकरणी तक्रार दाखल झाली आहे. झारखंडच्या लातेहार जिल्ह्यामध्ये हे गाव आहे.
२०१४ मध्ये झारखंड उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विरेंद्र सिंह यांनी गावाला भेट दिली त्यावेळी लालगडी गाव गुन्हेगारीमुक्त असल्याचे म्हटले होते. गावातील वाद पोलिसात नेण्याऐवजी चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याची या गावची शतकापासूनची परंपरा आहे. त्यामुळे इतक्या वर्षात या गावातून एकही पोलिस तक्रार दाखल झाली नव्हती.
गावच्या प्रमुखासमोर जे वादविवाद येतात त्याचे तोच निवाडे करतो. परंपरेचा भाग सोडला तर, या गावातील लोक गावच्या परिषदेच्या माध्यमातून वाद सोडवण्याचे दुसरे कारण आहे गरीबी. न्यायालयाच्या कायदेशीर लढाईचा खर्च परवडत नसल्याने या गावातील लोक गावच्या परिषदेच्या माध्यमातून वाद सोडवण्याला प्राधान्य देतात.