इस्त्रायलचा दौरा करणारे नरेंद्र मोदी ठरणार पहिले पंतप्रधान
By admin | Published: February 1, 2017 04:48 PM2017-02-01T16:48:51+5:302017-02-01T16:48:51+5:30
पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदींनी जगातील अनेक देशांचे दौरे केले असले तरी त्यांनी अद्याप इस्त्रायलला भेट दिलेली नाही.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदींनी जगातील अनेक देशांचे दौरे केले असले तरी त्यांनी अद्याप इस्त्रायलला भेट दिलेली नाही. पंतप्रधान मोदींचा बहुचर्चित इस्त्रायल दौरा 2017 च्या मध्यावर संपन्न होऊ शकतो. इस्त्रायल दौ-यावर जाणारे ते भारताचे पहिले पंतप्रधान ठरु शकतात.
इस्त्रायल भारताचा जवळचा मित्र असून इस्त्रायलने भारताला शेतीसह लष्करी तंत्रज्ञानात नेहमीच मदत केली आहे. दोन्ही देशांच्या घनिष्ठ संबंधांना 25 वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने मोदी इस्त्रायल दौ-यावर जाऊ शकतात. इस्त्रायलमधील भारताचे राजदूत पवन कपूर यांनी वायनेट या संकेतस्थळाला ही माहिती दिली.
संरक्षण भागीदारी वाढवण्याबरोबर मेक इन इंडियातर्गत भारतात गुंतवणूक आणणे हा या दौ-याचा उद्देश आहे. मोदींच्या दौ-याच्या तारखा अद्याप निश्चित झाल्या नसल्या तरी जून-जुलैच्या दरम्यान हा दौरा होऊ शकतो.
जानेवारी 1992 मध्ये दोन्ही देशांमध्ये डिप्लोमॅटीक संबंधांना सुरुवात झाली. पण भारताने इस्त्रायलचा असा उच्चस्तरीय दौरा करणे टाळले होते. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ऑक्टोंबर 2015 मध्ये इस्त्रायल दौ-यावर गेले होते. भारताच्या प्रमुखांनी केलेला हा पहिलाच इस्त्रायल दौरा होता. 2003 मध्ये इस्त्रायलचे तात्कालिन पंतप्रधान एरियल शारॉन भारत दौ-यावर आले होते. इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी केलेला तो एकमेव दौरा होता.