गुजरातमध्ये उभे रहाणार देशातील पहिले रेल्वे विद्यापीठ

By Admin | Published: February 1, 2016 12:47 PM2016-02-01T12:47:25+5:302016-02-01T14:08:28+5:30

गुजरातमधील वडोदरा येथे देशातील पहिले रेल्वे विद्यापीठ उभारण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी दिली आहे.

The first Railway University in the country to stand in Gujarat | गुजरातमध्ये उभे रहाणार देशातील पहिले रेल्वे विद्यापीठ

गुजरातमध्ये उभे रहाणार देशातील पहिले रेल्वे विद्यापीठ

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत 

वडोदरा, दि. १ - गुजरातमधील वडोदरा येथे देशातील पहिले रेल्वे विद्यापीठ उभारण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी दिली आहे. दोन दिवसाच्या गुजरात दौ-यावर आलेले सिन्हा म्हणाले की, गुजरात सरकार विद्यापीठासाठी लागणारी जागा निवडण्यासाठी भारतीय रेल्वेला मदत करत आहे. 
रेल्वे विद्यापीठासाठी सुरुवातीला वडोद-यातील प्रताप विलास पॅलेसची जागा वापरण्यात येईल. सध्या इथे भारतीय रेल्वे राष्ट्रीय प्रबोधिनी आहे. जमिन अधिग्रहण केल्यानंतर वडोद-यामध्ये पूर्णवेळ रेल्वे विद्यापीठ सुरु होईल अशी माहिती सिन्हा यांनी दिली. डिसेंबर २०१५ मध्ये रेल्वे मंत्रालयाने रेल्वे विद्यापीठ उभारण्याची घोषणा केली होती. 
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय रेल्वे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावर काम करत असून, लवकरच यासंबंधीचा प्रस्ताव संसदेसमोर मंजूरीसाठी ठेवण्यात येईल अशी माहिती मनोज सिन्हा यांनी दिली. 
पहिल्या टप्प्यात विद्यापीठाकडून एमबीए आणि एमटेकची पदवी दिली जाईल त्यानंतर रेल्वे ऑपरेशनमध्ये बीटेक आणि डिप्लोमाचा अभ्यासक्रम शिकवला जाईल. भारतीय रेल्वे राष्ट्रीय प्रबोधिनी सध्या रेल्वे स्टाफ कॉलेज म्हणून ओळखली जाते. सध्याच्या घडीला भारतीय रेल्वेची ही सर्वोच्च प्रशिक्षण संस्था आहे. 

Web Title: The first Railway University in the country to stand in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.