आधी बलात्कार, मग महिलेला जिंवंत जाळलं! मणिपूरमध्ये सशस्त्र हल्लेखोरांची दहशत, 17 घरांना लावली आग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 01:49 PM2024-11-09T13:49:59+5:302024-11-09T13:53:02+5:30
या हल्ल्यात हल्लेखोरांनी 17 घरे जाळली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत पीडितेवर सामूहिक बलात्कार करून, तिची हत्या करण्यात आली आहे...
मणिपूरमधील जिरिबाम जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे गुरुवारी (7 नोव्हेंबर) रात्रीच्या सुमारास एका 31 वर्षीय आदिवासी महिलेवर बलात्कार करून तिला जिवंत जाळण्यात आल्याचे वृत्त आहे. यावेळी सशस्त्र हल्लेखोरांनी गोळीबार करत लुटालूट आणि जाळपोळ केली. या हल्ल्यात हल्लेखोरांनी 17 घरे जाळली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत पीडितेवर सामूहिक बलात्कार करून, तिची हत्या करण्यात आली आहे.
पोलिसांनी संबंधित एफआयआरमध्ये, "वांशिक आणि सामुदायिक धरतीवर बलात्कार आणि हत्या झाल्याचा" उल्लेख केला आहे. पीडितेच्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल करत म्हटले आहे की, हे कृत्य अवैध घुसखोरांकडून करण्यात आले आहे. मात्र, अद्याप हल्लेखोरांची ओळख पटलेली नाही. तसेच, पोलिसांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर मणिपुरातील स्थानीय भागातील असल्याचे म्हटले आहे.
हल्लेखोरांची दहशत -
स्थानिक आदिवासी वकिल समितीने (ITAC) एक निवेदन जारी केले आहे. यात, "हल्लेखोरांनी गावात प्रवेश करताच घरांना आग लावली आणि गोळीबार सुरू केला. यावेळी गावातील लोक जीव वाचवण्यासाठी जंगलाच्या दिशेने पळू लागले, मात्र एक महिला अडकली आणि तिची निर्घृण हत्या करण्यात आली.
आदिवासी संघटनांकडून केंद्राकडे हस्तक्षेपाची मागणी -
या घटनेनंतर आदिवासी संघटनांकडून मणिपूरमधील कुकी-झोमी-हमार समुदायांच्या सुरक्षेसंदर्भात केंद्र सरकारकडे हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्या आली आहे. याशिवाय, चुरचंदपूर येथील आदिवासी संघटना इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरमनेही या प्रकरणातील गुन्हेगारांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.