संघाची पहिली लष्करी शाळा सुरू होणार; एप्रिलपासून वर्ग भरणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 20:14 IST2020-01-27T20:11:39+5:302020-01-27T20:14:07+5:30
शाळेच्या इमारतीचं बांधकाम जवळपास पूर्ण; लवकरच प्रवेश प्रक्रिया

संघाची पहिली लष्करी शाळा सुरू होणार; एप्रिलपासून वर्ग भरणार
लखनऊ: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली लष्करी शाळा उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहरात सुरू होणार आहे. एप्रिल महिन्यात ही शाळा सुरू होईल. रज्जू भैय्या सैनिक विद्या मंदिर (आरबीएसव्हीएम) असं या शाळेचं नाव असेल. रज्जू भैय्या माजी सरसंघचालक होते. या शाळेची इमारत जवळपास पूर्ण झाली असून इयत्ता सहावीच्या पहिल्या तुकडीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. या तुकडीत १६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल.
आरबीएसव्हीएममध्ये राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनी, नौदल अकादमी आणि भारतीय लष्कराच्या तांत्रिक परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची तयारी करुन घेण्यात येईल, अशी माहिती शाळेचे संचालक शिव प्रताप सिंह यांनी दिली. या शाळेत प्रवेश घेण्यासाठी २३ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यानंतर १ मार्चला विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा घेण्यात येईल. विद्यार्थ्यांचं सामान्यज्ञान, गणित, इंग्रजी तपासून पाहण्यासाठी प्रवेश प्रक्रिया घेतल्यानंतर त्यांची मुलाखत आणि वैद्यकीय चाचणी घेतली जाईल. यानंतर ६ एप्रिलपासून शाळा सुरू होईल, असं सिंह यांनी सांगितलं.
आरबीएसव्हीएममध्ये आठ जागा देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या जवानांच्या मुलांसाठी राखीव असतील. या मुलांना वयातही सवलत दिली जाईल. या व्यतिरिक्त शाळेत कोणतंही आरक्षण असणार नाही. या शाळेत सीबीएसईचा अभ्यासक्रम असेल. शाळेसाठी शिक्षक आणि व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांची निवड प्रक्रिया फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल. विद्या भारती या संघाच्या शिक्षण संघटनेमधील व्यक्तीची शाळेच्या मुख्याध्यापकपदी निवड करण्यात येईल.
आरबीएसव्हीएममध्ये विद्यार्थी आणि शिक्षक अशा दोघांनाही गणवेश असेल. विद्यार्थ्यांना फिकट निळ्या रंगाची आणि गडग निळ्या रंगाची पँट असा गणवेश असेल. तर शिक्षकांना पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि राखाडी रंगाची पँट असा गणवेश देण्यात येईल. विद्यार्थ्यांना नैतिक आणि आध्यात्मिक मार्गदर्शन देण्यासाठी ही शाळा सुरू करण्यात येत असल्याची माहिती संघाच्या पदाधिकाऱ्यानं दिली.