RSS आता तयार करणार जवान, पुढच्या वर्षी उघडणार लष्करी शाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 12:50 PM2019-07-29T12:50:06+5:302019-07-29T12:50:21+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये लष्करी शाळा उघडण्याच्या तयारीत आहेत.
नवी दिल्लीः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये लष्करी शाळा उघडण्याच्या तयारीत आहेत. या शाळेत मुलांना लष्करात अधिकारी बनवण्यासाठीच प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या शाळेच्या संचालनाची जबाबदारी आसएसएसच्या विद्या भारतीकडे देण्यात आली आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सच्या रिपोर्टनुसार, RSSचे सरसंघचालक राजेंद्र सिंह ऊर्फ रज्जू भय्या यांच्या नावावरून या शाळेचं नाव रज्जू भैय्या सैनिक विद्यामंदिर ठेवण्यात येणार आहे. शाळेची स्थापना उत्तर प्रदेश बुलंदशहर जिल्ह्यातील शिकारपूरमध्ये केली जाणार आहे. याच ठिकाणी 1922 रोजी रज्जू भैया यांचा जन्म झाला आहे.
सीबीएसई बोर्डाचा सिलेबस वापरणार
रिपोर्टनुसार, शाळेच्या निर्माणाचं कार्य सुरू करण्यात आंल आहे. ही एक होस्टल प्रकारातली शाळा असून, इथे सैनिकी प्रशिक्षण दिलं जाणार आहे. पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये या शाळेत शिक्षणाचे धडे शिकवले जाणार आहेत. या शाळेत सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम शिकवला जाणार असून, इयत्ता 6वी ते 12वी पर्यंतचे विद्यार्थ्यांना इथे शिक्षण घेता येणार आहे. आरएसएसचा हा पहिला प्रयोग यशस्वी झाल्यास देशातल्या दुसऱ्या राज्यांतही अशा प्रकारच्या शाळा उघडल्या जाणार आहेत.
या शाळेतल्या प्रवेशाची प्रक्रिया पुढील महिन्यापासून सुरू होणार असून, सर्वात पहिल्यांदा सहावीच्या 160 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. तसेच या शाळेत 56 जागा या शहीद जवानांच्या मुलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. या शाळेसाठी जवळपास 40 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. आरएसएसला ही जमीन माजी सैनिक आणि शेतकरी राजपल सिंह यांनी दान स्वरूपात दिली आहे. शाळेची तीन मजली इमारत बांधण्यात येणार असून, त्यात एक हॉस्टेलही असणार आहे. तसेच स्टाफ रूप, वर्ग खोल्या, डिस्पेंसरी आणि एक विशाल स्टेडियम असणार आहे.