काश्मीरमध्ये पहिल्याच बर्फवृष्टीने जनजीवन विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 05:28 AM2018-11-05T05:28:28+5:302018-11-05T05:28:45+5:30
काश्मीरमध्ये यंदा हिवाळ्याच्या मोसमातील सर्वात पहिली व जोरदार बर्फवृष्टी शनिवारपासून सुरू झाली. ती रविवारीही कायम होती.
श्रीनगर - काश्मीरमध्ये यंदा हिवाळ्याच्या मोसमातील सर्वात पहिली व जोरदार बर्फवृष्टी शनिवारपासून सुरू झाली. ती रविवारीही कायम होती. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असून, विमानसेवा व रस्त्यावरील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. राजौरी जिल्ह्यातील चटयार गावी बकरवाल कुटुंब राहत असलेल्या झोपडीवर शनिवारी रात्री ११.३० वाजता दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत शबिना कौसर ही मुलगी जागीच ठार झाली. तिच्या कुटुंबातील तिघे जण गंभीर जखमी असून, त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.
बर्फवृष्टीमुळे झाडांच्या फांद्या विजेच्या तारांवर कोसळत असून, त्यामुळे विद्युत पुरवठ्यात अडथळे येत आहेत. राज्याच्या वीज खात्याचे मुख्य अभियंते हश्मत काझी यांनी सांगितले की, नेहमी १,३०० मेगावॅट विजेचा पुरवठा होतो; पण दोन दिवसांत आलेल्या अडचणींमुळे हे प्रमाण ८० मेगावॅटवर आले आहे. २००९ पासून पहिल्यांदाच श्रीनगर शहरात नोव्हेंबर महिन्यात बर्फवृष्टी झाली आहे. तिथे त्याआधी २००४ व २००८ च्या नोव्हेंबर महिन्यात अशी घटना घडली होती.
बांदिपोरा जिल्ह्यात हिमस्खलनाच्या घटना घडल्या व पाऊसही पडला. श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होणारी काही उड्डाणे रविवारी रद्द करण्यात आली. श्रीनगर-जम्मूला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकही तात्पुरती थांबविण्यात आली असून, त्यामुळे असंख्य प्रवाशांचे हाल झाले. रविवार दुपारपासून हा महामार्ग एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. जवाहर बोगद्यानजीक ३०० प्रवासी बर्फवृष्टीमुळे अडकून पडले होते.