आत्मनिर्भरतेचं पहिलं पाऊल... गृहमंत्री अमित शहांकडून 'स्वदेशी'च्या वापराचा आदेश जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 02:58 PM2020-05-13T14:58:42+5:302020-05-13T14:59:41+5:30
गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आत्मनिर्भर भारत होण्यासाठी स्वदेशीचा नारा दिला आहे. देशातील नागरिकांना स्वदेशी म्हणजे देशात बनणाऱ्या वस्तूंचाच सर्वाधिक वापर करावा
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी देशवासियांना संबोधित करताना स्वदेशीचा नारा दिला. आम्ही स्वावलंबी भारत बनवू शकतो. निश्चय केला तर कोणतेही लक्ष्य साध्य करता येते. निश्चयाने भारत स्वावलंबी होऊ शकतो. शेतकरी, श्रमिक, गरीब, मध्यम वर्गासह समाजातील सर्व घटकांसोबत कुटीर, सूक्ष्म, लघु-मध्यम उद्योगाला दिलासा देण्यासाठी घोषित केलेल्या २० लाख कोटींच्या विशेष आर्थिक योजनेनं स्वावलंबी भारताला गती मिळेल. सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने घोषित केलेल्या निर्णयांसह हे विशेष आर्थिक पॅकेज २० लाख कोटींचे असेल. ते देशाच्या ढोबळ उत्पादनाच्या (जीडीपी) १० टक्के एवढे आहे, असे मोदींनी सांगितले. त्यानंतर, गृहमंत्री अमित शहा यांनी आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आत्मनिर्भर भारत होण्यासाठी स्वदेशीचा नारा दिला आहे. देशातील नागरिकांना स्वदेशी म्हणजे देशात बनणाऱ्या वस्तूंचाच सर्वाधिक वापर करावा, तसेच इतरांनाही स्वेदशीचं महत्त्व पटवून देत त्यांनाही याच वस्तुंच्या वापराचा आग्रह करावा, असे अमित शहा यांनी सांगितले. तसेच, जर प्रत्येक भारतीय नागरिकाने भारतात बनणाऱ्या स्वदेशी वस्तूंच्या वापराचा संकल्प केल्यास, पुढील ५ वर्षात देशातील लोकशाही आत्मनिर्भर म्हणजेच स्वावलंबी बनू शकते, असा मूलमंत्रच शहा यांनी दिला आहे.
अमित शहा यांनी देशावासीयांना स्वदेशीचा नारा देतानाच, आत्मनिर्भरतेचं पहिलं पाऊल टाकलं आहे. देशातील केंद्रीय सशस्त्र दलाच्या सर्वच कँटींग आणि स्टोअर्समध्ये केवळ स्वदेशी वस्तूंचीच विक्री करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत. १ जून २०२० पासून देशातील सर्वच सीएपीएफ कँटीनसाठी हा आदेश लागू असणार आहे. ज्याची एकूण खरेदी साधारणत: २८०० कोटी रुपये एवढी आहे. या निर्णयामुळे १० लाख सीएपीएफ कर्मचाऱ्यांचे ५० लाख नातेवाईक स्वेदशीचा वापर करतील, असे अमित शहा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलेल्या पत्रात म्हटले आहे.
कल माननीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी ने देश को आत्मनिर्भर बनाने और लोकल प्रोडक्ट्स (भारत में बने उत्पाद) उपयोग करने की एक अपील की जो निश्चित रूप से आने वाले समय में भारत को विश्व का नेतृत्व करने का मार्ग प्रशस्त करेगी। pic.twitter.com/KlYD9Z7UVt
— Amit Shah (@AmitShah) May 13, 2020
दरम्यान, आपल्या भाषणात मोदी म्हणाले की, आम्हाला या काळाने शिकवले आहे की, लोकलला (स्थानिक) आपला जीवनमंत्र बनवावाच लागेल. आपल्याला जे काही ग्लोबल ब्रांड लागतात, तेही कधी तरी असेच लोकल होते. जेव्हा तेथील लोकांनी त्याचा वापर सुरू केला व प्रचार केला तेव्हा ते लोकलच होते. त्यांचे ब्रांडिंग केले गेले. त्यांच्याबाबत अभिमान बाळगला गेला तेव्हा तर ते लोकलपासूल ग्लोबल झाले. त्यामुळे आज प्रत्येक भारतीयाने आपल्या लोकलसाठी व्होकल बनले पाहिजे. तुम्ही केवळ लोकल प्रॉडक्टच खरेदी करून भागणार नाही तर त्याचा अभिमानही बाळगला पाहिजे. तुमच्या प्रयत्नांनी तर तुमच्यावरील माझी श्रद्धा आणखी वाढली आहे.