आधी प्रियांका गांधींवर विचित्र टीका नंतर आतिशी यांच्याबाबत भाजप नेते बिधुरी यांची घसरली जीभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 08:46 IST2025-01-06T08:46:22+5:302025-01-06T08:46:57+5:30
अरविंद केजरीवालांचे प्रत्युत्तर, म्हणाले- भाजप नेत्यांनी निर्लज्जपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत

आधी प्रियांका गांधींवर विचित्र टीका नंतर आतिशी यांच्याबाबत भाजप नेते बिधुरी यांची घसरली जीभ
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : रविवारी सकाळी काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांच्याबद्दल तर सायंकाळी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्याबद्दल भाजप नेते व कालकाजी विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार रमेश बिधुरी यांनी आक्षेपार्ह विधाने केली. एका प्रचार सभेत 'विधानसभा निवडणुकीत विजयीझालो तर मतदारसंघातील रस्ते काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींच्या गालासारखे गुळगुळीत बनवू' असे वक्तव्य केले. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर देत भाजपला लक्ष्य केले. चहुबाजूंनी टीका झाल्यानंतर बिधुरी यांनी 'एक्स'वर पोस्ट करीत खेद प्रकट केला.
त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले. कालकाजीमधून आतिशी आपच्या उमेदवार आहेत. त्यांच्याबद्दल बिधुरी म्हणाले, आतिशी यांनी बाप बदलला आहे. त्या आधी मार्लेना होत्या आणि आता सिंह झाल्या आहेत.
काँग्रेस, आपचे टीकास्त्र
- काँग्रेस नेते पवन खेडा यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. बिधुरी यांनी महिलांचा अवमान केल्याचा आरोप महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अलका लांबा यांनी केला.
- अरविंद केजरीवाल म्हणाले की, भाजप नेत्यांनी निर्लज्जपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. भाजप नेते आतिशी यांना शिवीगाळ करत आहेत. महिला मुख्यमंत्र्यांचा हा अपमान दिल्लीची जनता सहन करणार नाही.