आधी अतिरेकी हल्ला, नंतर पुराचा हाहाकार
By admin | Published: September 10, 2014 03:11 AM2014-09-10T03:11:08+5:302014-09-10T03:11:08+5:30
आधी अतिरेकी हल्ला आणि नंतर पुरामुळे उडालेला हाहाकार यातून मरणाशी दोनहात करून एकाच कुटुंबातील तिघे जण मुंबईत सुखरूप परतले आहेत
मनीष म्हात्रे , मुंबई
आधी अतिरेकी हल्ला आणि नंतर पुरामुळे उडालेला हाहाकार यातून मरणाशी दोनहात करून एकाच कुटुंबातील तिघे जण मुंबईत सुखरूप परतले आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
चेंबूर कॅम्पमध्ये राहणारे विजय ठाकूर आणि त्यांची पत्नी सविता परिचितांच्या विवाहासाठी श्रीनगरला गेले होते. या वेळी त्यांच्यासोबत कौटुंबिक मित्र अमित ओबेरॉय, पिंकी ओबेरॉय, त्यांची मुलगी रिया आणि बंटी हुडा, कांचन हुडा व त्यांंचा मुलगा पृथ्वी हे देखील होते. २ सप्टेंबरला कॉलेजमधील मैत्रिणीचे लग्न असल्याने हे सर्व कुटुंबीय ३० आॅगस्टलाच श्रीनगरकडे रवाना झाले. या वेळी सविताने विक्रोळीमध्ये राहणाऱ्या तिच्या आई-बाबांना श्रीनगरला उतरल्यावर कॉलही केला होता. लग्नसोहळ्यानंतर काही दिवस जम्मू-काश्मीरमध्ये घालवण्याच्या विचारात त्यांनी श्रीनगर परिसरातील कोहलीज हॉटेलमध्ये बुकिंग केले होते, मात्र लग्नसोहळ्याच्या दिवशीच ते अतिरेक्यांच्या जाळ्यात अडकले. लग्नस्थळी अतिरेकी घुसल्याच्या सविताच्या कॉलने तिच्या आई-वडिलांची-कांबळे कुटुंबीयांची झोपच उडाली. मात्र त्यातून ते सुखरूप बाहेर निघाल्याचे समजताच त्यांच्या जिवात जीव आला. त्यातून सुटका होते न् होते तोच काश्मीरमधल्या पुराने त्यांना गाठले. त्यामुळे घरी परतणे शक्यच नसल्याचे सविताने कळवले. त्यांचे कुटुंबीय त्यांना मदत करण्यासाठी धडपडत होते, मात्र संपर्क होत नव्हता. नंतर मात्र सविताचा कॉल आला आणि कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ते मुंबईत दाखल झाल्याने कुटुंबीय निश्चिंत झाले. (प्रतिनिधी)