आधी डॉक्टर चाखणार, मग पाहुणे जेवणार..!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 05:55 AM2022-12-14T05:55:34+5:302022-12-14T05:55:43+5:30
डॉक्टरांवर जी-२० प्रतिनिधींचे जेवण तपासण्याची जबाबदारी
- संतोष आंधळे
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या बैठकांना मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. यासाठी जी-२० सदस्य देशांच्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती मुंबईत आल्या आहेत. हे सर्व प्रतिनिधी विविध ठिकाणी राहणार आहेत, बैठका घेणार आहेत. तेथील अन्नाचा दर्जा तपासण्याची जबाबदारी निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणजेच डॉक्टरांवर असणार आहे. एमबीबीएससारखे उच्च शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना गिनिपिग करण्याचा प्रकार बंद करण्याची मागणी होत आहे.
संबंधित ब्रिटिशकालीन नियमांमध्ये बदल करून डॉक्टरांच्या जागी अन्न आणि औषध प्रशासन विभागातील तज्ज्ञांची नेमणूक करण्याबाबत सूर व्यक्त केला जात आहे. हे प्रकार थांबायला हवेत, याबाबत वैद्यकीय क्षेत्रातून मोठा रोष व्यक्त केला जात आहे. परदेशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती येतात. तेव्हा त्यांच्या वैद्यकीय सुविधांसाठी वरिष्ठ डॉक्टरांचे पथक, ॲम्ब्युलन्ससह तैनात केले जाते. एखादा वैद्यकीय आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास त्यासाठी पथकातील डॉक्टरांनी काम करणे अपेक्षित असते. यासाठी राज्य शासनाच्या रुग्णालयातील डॉक्टरांची नेमणूक करण्यात येते. मात्र, याव्यतिरिक्त निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही नेमणूक करण्यात येते. त्यांचे काम महत्त्वाच्या व्यक्तींना दिले जाणारे अन्न तपासण्याचे असते. या विशेष कामासाठी १५ निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये जे. जे., कामा, जी. टी. आणि सेंट जॉर्ज रुग्णालयातील डॉक्टरांचा समावेश आहे. या डॉक्टरांना पाहुण्यांचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण, तसेच बैठकीमध्ये दिल्या जाणाऱ्या खाण्याच्या पदार्थांची चव चाखावी लागणार आहे.
कसे करतात काम?
ज्या हॉटेलमध्ये पाहुण्यांसाठी जेवण बनविले जाणार आहे, तेथे निवासी वैद्यकीय अधिकारी आणि दोन पोलिस पाहुण्यांना देणार असलेले अन्न खाऊन बघतात. त्यानंतर निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अन्नपदार्थ खाण्यायोग्य आहे, असे सांगितल्यानंतर थोड्या वेळानंतर ते पाहुण्यांना दिले जाते.
...मग अन्न व औषध प्रशासन कशासाठी?
एका वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या विषयावर काही वर्षांपूर्वीही गदारोळ झाला होता. सगळ्यांना मान्य आहे की, अशा पद्धतीने डॉक्टरांना जेवणाची तपासणी करायला लावणे चुकीचे आहे.
मात्र, हे ब्रिटिशकालीन नियम बदलायची तसदी मात्र कुणी घेत नाही. कुणीही डॉक्टर उघडपणे या विषयावर बोलण्यास कचरतात.
खाद्यपदार्थ तपासणीचे काम अन्न आणि औषध प्रशासनातील तज्ज्ञ रसायनांचा आधार घेऊन करू शकतात. वैद्यकीय सुविधांसाठी वैद्यकीय पथकाची नेमणूक गरजेची आहे. जेवण तपासणीसाठी डॉक्टर योग्य नाही.