आधी म्हणतात चौकशी करा, आता ओरडतात; ईडी चाैकशीवरून अमित शाह यांचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 08:34 AM2023-03-19T08:34:47+5:302023-03-19T08:35:05+5:30
अदानी समूहाविरुद्धच्या चौकशीबाबत विचारले असता अमित शाह म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने समिती स्थापन केली आहे आणि प्रत्येकाने जाऊन त्यांच्याकडे जे काही पुरावे असतील ते सादर करावेत.
नवी दिल्ली : सीबीआय आणि ईडीसारख्या तपास यंत्रणा निःपक्षपातीपणे काम करीत आहेत. तसेच, दोन प्रकरणे वगळता ते तपास करीत असलेल्या सर्व प्रकरणांची नोंद यूपीए सरकारच्या काळात करण्यात आली होती, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले.
येथे एका कार्यक्रमात बोलताना अमित शाह म्हणाले की, तपास यंत्रणा जे काही करत आहेत, त्याला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. २०१७ मध्ये, उत्तर प्रदेश निवडणुकीच्या वेळी, काँग्रेसच्या एका मोठ्या महिला नेत्याने म्हटले होते की, जर ते भ्रष्टाचारात गुंतले आहेत, तर चौकशी का नाही केली जात? आता कारवाई झाली तर ते आरडाओरड करत आहेत.
यूपीए सरकारच्या १० वर्षांच्या कारकिर्दीत १२ लाख कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचे आरोप झाले, तेव्हा सरकारने सीबीआयमार्फत गुन्हा दाखल केला.
‘अदानी’बाबत पुरावे असल्यास सादर करा
अदानी समूहाविरुद्धच्या चौकशीबाबत विचारले असता अमित शाह म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने समिती स्थापन केली आहे आणि प्रत्येकाने जाऊन त्यांच्याकडे जे काही पुरावे असतील ते सादर करावेत.
...तर संसदेतील कोंडी सुटेल
विरोधी पक्ष चर्चेसाठी पुढे आले तर संसदेतील सध्याची कोंडी सोडवली जाऊ शकते, असे शाह यांनी सांगितले. ते म्हणाले की, विरोधी पक्षाकडून चर्चेचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. मग आम्ही कोणाशी बोलणार? ते माध्यमांशी बोलत आहेत.