भारत-बांगलादेश सीमेवर पहिल्यांदाच महिला गार्ड तैनात, घनदाट जंगलाच्या मध्यभागी शत्रूंशी लढणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 11:17 PM2022-12-19T23:17:11+5:302022-12-19T23:18:04+5:30
घनदाट जंगल आणि पाण्याने वेढलेल्या या भागात कायमस्वरूपी चौक्याऐवजी फ्लोटिंग बीओपींद्वारे बीएसएफ चोवीस तास लक्ष ठेवते.
कोलकाता : पश्चिम बंगालमधील उत्तर आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील भारत आणि बांगलादेशच्या सीमेदरम्यान शेकडो चौरस किलोमीटर पसरलेल्या सुंदरबन क्षेत्राची सुरक्षा हे एक अतिशय आव्हानात्मक काम आहे. या भागातून जनावरे व अंमली पदार्थांची तस्करी आणि घुसखोरी ही मोठी समस्या बनली आहे. घनदाट जंगल आणि पाण्याने वेढलेल्या या भागात कायमस्वरूपी चौक्याऐवजी फ्लोटिंग बीओपींद्वारे बीएसएफ चोवीस तास लक्ष ठेवते.
बीएसएफ दक्षिण बंगाल फ्रंटियरने एक मोठे पाऊल उचलत पहिल्यांदाच या दलदलीच्या भागातून जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सीमेच्या सुरक्षेसाठी आणि प्रचंड घनदाट जंगले आणि नद्यांनी वेढलेल्या या दुर्गम भागाच्या सुरक्षेसाठी महिला सशक्तीकरणाचे प्रतीक असलेल्या महिला जवानांना तैनात केले आहे. या भागात पाळत ठेवण्यासाठी अलीकडेच तैनात करण्यात आलेल्या बीएसएफच्या सहा नवीन फ्लोटिंग बीओपींपैकी एक बीओपी गंगा येथील सुरक्षेची जबाबदारी आता पूर्णपणे महिला जवानांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे या बीओपीवरून सीमा सुरक्षेची धुरा आता महिलांनी हाती घेतली असून त्या स्वतंत्रपणे लढाऊ भूमिकेत दिसणार आहेत.
बीएसएफच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे. जेव्हा सुंदरबनसारख्या अवघड भागात तरंगत्या बीओपीच्या ऑपरेशनसाठी आणि सीमेवर गस्त घालण्यासाठी महिला रक्षकांची एक पलटण तैनात करण्यात आली आहे. त्यांच्या तैनातीमुळे महिला घुसखोरांकडून होणारी तस्करी रोखण्यासाठी विशेष मदत होणार आहे. दक्षिण बंगाल फ्रंटियरचे प्रवक्ते आणि डीआयजी अमरीश कुमार आर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसएफच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे. जेव्हा सुंदरबनसारख्या अवघड भागात सीमेवर गस्त घालण्यासाठी आणि फ्लोटिंग बीओपीच्या ऑपरेशनसाठी महिला जवानांना तैनात करण्यात आले आहे. तसेच, सध्या येथे महिला जवानांची तुकडी तैनात करण्यात आली आहे, ज्यात 15 ते 20 जवानांचा समावेश आहे, असे अमरीश कुमार आर्य यांनी सांगितले.
दरम्यान, सुंदरबन प्रदेशाची सुरक्षा हे खूप आव्हानात्मक काम आहे. या भागातून जनावरे व अंमली पदार्थांची तस्करी आणि घुसखोरी ही मोठी समस्या बनली आहे. घनदाट जंगल आणि पाण्याने वेढलेल्या या भागात कायमस्वरूपी चौक्याऐवजी बीएसएफ एका मोठ्या जहाजाचे फ्लोटिंग बीओपीमध्ये रूपांतर करून चोवीस तास लक्ष ठेवते. येथे दोन्ही देशांची सीमा रायमंगळ, इछामती अशा अनेक नद्यांमधून जाते, अशा परिस्थितीत जवान अत्यंत कठीण परिस्थितीत येथे कर्तव्य बजावतात.