भारतातील सामान्य माणसाला प्रथमच बहाल होणार संतपद; देवसहायम पिल्लई यांच्या कार्याचा गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 08:25 AM2021-11-12T08:25:01+5:302021-11-12T08:25:20+5:30
व्हॅटिकनचा निर्णय
तिरुवनंतपुरम : भारतामध्ये ख्रिश्चन समुदायाच्या इतिहासात प्रथमच एका सामान्य माणसाला व्हॅटिकन चर्चकडून संतपद बहाल केले जाणार आहे. देवसहायम पिल्लई असे त्यांचे नाव असून तामिळनाडूत १८ व्या शतकात त्यांचा जन्म झाला. ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर ते लाझारस या नावाने ओळखले जाऊ लागले.
पोप फ्रान्सिस हे अन्य सहा जणांसह देवसहायम पिल्लई यांनाही पुढील वर्षी १५ मे रोजी व्हॅटिकन येथील सेंट पीटर्स बॅसिलियामध्ये होणाऱ्या कार्यक्रमात संतपद बहाल करणार आहेत. ही घोषणा व्हॅटिकन चर्चने मंगळवारी केली. देवसहायम यांनी १७४५ मध्ये ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. देवसहायम किंवा लाझारस याचा अर्थ देवच माझा पाठीराखा आहे.
जातीपातीचे भेद दूर करा, सर्व लोक समान आहेत अशी शिकवण देवसहायम आपल्या प्रवचनांतून सर्वांना देत असत. त्यांच्या शिकवणीमुळे उच्चवर्णीयांतील अनेक लोक त्यांचा द्वेष करू लागले. परिणामी देवसहायम यांना १७४९ मध्ये अटक करण्यात आली. १४ जानेवारी १७५२ मध्ये त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांनी धर्मासाठी हौतात्म्य पत्करले होते. देवसहायम पिल्लई यांच्या ३०० व्या जयंती नंतर २ डिसेंबर २०१२ रोजी कोट्टार येथे एक विशेष समारंभ आयोजिण्यात आला होता. त्यात त्यांना ब्लेसड (प्रभूची कृपा) असलेले म्हणून जाहीर करण्यात आले. (वृत्तसंस्था)
कोट्टार येथे जपून ठेवल्या स्मृती
देवसहायम पिल्लई यांचा जन्म कन्याकुमारी जिल्ह्यातील नत्तालम येथे हिंदू नायर कुटुंबात २३ एप्रिल १७१२ रोजी झाला होता. त्यावेळी हा भाग तत्कालीन त्रावणकोर संस्थानात होता. तामिळनाडूत कोट्टार येथे त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या तसेच याच परिसरात त्यांनी हौतात्म्य पत्करले.