आदर्श संसदपटूंचा देशात प्रथमच गौरव

By admin | Published: July 15, 2017 05:39 AM2017-07-15T05:39:15+5:302017-07-15T05:39:15+5:30

‘लोकमत’ वृत्तपत्र समूहातर्फे १९ जुलै रोजी दिल्लीच्या विज्ञान भवनात ‘लोकमत संसदीय पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे

For the first time in the country of ideal parliamentarians honor | आदर्श संसदपटूंचा देशात प्रथमच गौरव

आदर्श संसदपटूंचा देशात प्रथमच गौरव

Next

सुरेश भटेवरा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहातर्फे १९ जुलै रोजी दिल्लीच्या विज्ञान भवनात ‘लोकमत संसदीय पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते लोकसभा व राज्यसभेतील प्रत्येकी ४ अशा ८ आदर्श खासदारांना ‘लोकमत संसदीय पुरस्कारा’ने या वेळी सन्मानित करण्यात येणार आहे.
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग व एच. डी. देवेगौडा, अर्थमंत्री अरुण जेटली, नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू, काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खडगे, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी व माजी लोकसभाध्यक्ष शिवराज पाटील हे कार्यक्रमात प्रमुख अतिथी असतील.
भारतीय संसदेतर्फे उत्कृष्ट संसदीय कामगिरीबद्दल ‘उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार’ देण्याची प्रथा आहे. तथापि, प्रसार माध्यमाद्वारे दोन्ही सभागृहांतील प्रत्येकी ४ संसद सदस्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्याचा हा देशातील पहिलाच प्रयोग, ‘लोकमत’तर्फे साकार होत आहे. वर्ष २0१६ मध्ये लोकसभा व राज्यसभेच्या ज्या मान्यवर सदस्यांनी विशेष उल्लेखनीय अष्टपैलू कामगिरी बजाविली, अशांना, तसेच संसदेत प्रथमच पदार्पण करणाऱ्या २, महिला खासदारांपैकी २, आदर्श संसदपटू २ सदस्य यांच्या सन्मानाबरोबच, दोन्ही सभागृहांतील प्रत्येकी १ मान्यवर ज्येष्ठ खासदारांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने या वेळी सन्मानित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात गेल्या वर्षी विधिमंडळ पुरस्काराला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे त्यापासून प्रेरणा घेत लोकमतने संसद सदस्यांसाठी पुरस्कार सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला.
>या ज्युरींनी केली निवड
पुरस्कारप्राप्त संसद सदस्यांची निवड करण्याची जबाबदारी ‘लोकमत’ने देशातील मान्यवर नेते व पत्रकारांच्या ज्युरी मंडळावर सोपविली होती. तीन बैठकांमध्ये सुमारे ९ तासांच्या चर्चेनंतर या मंडळाने ८ संसद सदस्यांची निवड केली आहे. ज्युरी मंडळाचे अध्यक्षपद लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील यांनी भूषवले. ज्युरी मंडळात डॉ. मुरली मनोहर जोशी, मल्लिकार्जुन खडगे, सीताराम येचुरी, शरद यादव, इंडिया टीव्हीचे संपादक रजत शर्मा, इंडिया टुडेचे राजकीय संपादक राजदीप सरदेसाई, ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा व सदस्य सचिव पत्रकार हरीश गुप्ता यांचा समावेश होता.

Web Title: For the first time in the country of ideal parliamentarians honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.