केंद्रीय मंत्री असताना महामंडलेश्वर बनणाऱ्या निरंजन ज्योती पहिल्याच मंत्री
By किरण अग्रवाल | Published: January 14, 2019 12:11 PM2019-01-14T12:11:59+5:302019-01-14T13:02:32+5:30
केंद्रीय मंत्री असताना महामंडलेश्वर बनणाऱ्या निरंजन ज्योती पहिल्याच मंत्री आहेत. पट्टाभिषेकापूर्वी राम मंदिर लवकरच पूर्ण होईल अशी भावना निरंजन ज्योती यांनी व्यक्त केली आहे.
किरण अग्रवाल
प्रयागराज - केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती पंचायती निरंजनी आखाड्याच्या महामंडलेश्वर पट्टाभिषेकसाठी आनंद पिठाधिश्वर स्वामी बालकानंद गिरी समवेत आखाड्यात दाखल झाल्या आहेत. आखाडा परिषद अध्यक्ष महंत नरेंद्र गिरीसह अनेक संत उपस्थित आहेत. केंद्रीय मंत्री असताना महामंडलेश्वर बनणाऱ्या निरंजन ज्योती पहिल्याच मंत्री आहेत. पट्टाभिषेकापूर्वी राम मंदिर लवकरच पूर्ण होईल अशी भावना निरंजन ज्योती यांनी व्यक्त केली आहे. धर्म व राजकारण या सेवेसाठी एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचेही त्यांनी सांगितले. गुरुदेव परमानंद गिरी जी देखील दाखल झाले आहेत. आखाडे देखील व्यक्तित्व निर्मितीचे केंद्र असल्याचे व सनातन धर्म बळकट करण्याच काम त्याद्वारे होत असल्याचे स्वामी बालकानंद गिरी यांनी यावेळी बोलताना सांगितले.
मंत्र जप व नमो पार्वती पतेच्या घोषात पट्टाभिषेक प्रक्रिया पूर्ण झाली. आखाडा नेहमी महिलांचा सन्मान करीत आल्याचे सांगत निरंजनी आखाडा, आनंद आखाडा, महानिर्वानी, अटल, अग्नी, जुना उदासीन, निर्मल आदी आखड्यातर्फे विविध महंतांहस्ते चादर पांघरून साध्वी निरंजन ज्योतींचा सन्मान करण्यात आला. आखाडा परिषद सचिव महंत हरीगिरीजी, गजाचरणजी (गुजरात), मा नंदाकिनी जी, आत्मचेततनानंद जी, आशुतोषानंद गिरी (काशी), अनंत देवगिरीजी, प्रेमानंद महाराज, गजानंदगिरी जी, आदित्य गिरी (गुजरात), हरिओम गिरी, मंजू श्री जी ( नोएडा), प्रशांत गिरी (पटियाला), आदी संताची मोठी उपस्थिती होती. मात्र राजकीय नेते या कार्यक्रमापासून दूर होते.
कुंभमेळ्याच्या पवित्र स्नानासाठी प्रयागराज तीर्थ येथे देश-विदेशातून हजारो भाविक दाखल झाले असून मकर संक्रांतीच्या दिनी 15 जानेवारी रोजी पहिले शाही स्नान होणार आहे त्यासाठी अलाहाबाद नगरी सज्ज झाली आहे. प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर सुमारे 45 एकर क्षेत्रामध्ये साधुग्राम म्हणून अस्थायी शहर वसविण्यात आले असून त्यात विविध आखाडे व त्यांच्या महंत तसेच महामंडलेश्वर यांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे. साधुग्राममध्ये जाण्यासाठी नदीच्या पाण्यावर तरंगणाऱ्या लोखंडी ड्रमसवर 24 तात्पुरते पूल उभारण्यात आले आहेत. सर्वच आखाड्यांमध्ये भाविकांसाठी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून अहोरात्र भंडाराही सुरू आहे, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे हभप रामकृष्ण लहवीतकर महाराज व त्यांचे अनुयायीही शाही स्नानात सहभागी होणार आहेत.
कुंभमेळ्यासाठी अवघी प्रयागराज नगरी सजली असून जागोजागी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. सरकारी इमारतींवर तसेच शहरातील पुलांवर व चौकांवर कुंभशी निगडित धार्मिक चित्रे चितारण्यात आली आहेत. उत्तर प्रदेश सरकारनेही गेल्या दीड वर्षात केलेल्या कामगिरीचे फलक जागोजागी लावले आहेत.