अत्याधुनिक रडारसह भारताचं लढाऊ विमान जग्वार चीन-पाकिस्तानचा वेध घेण्यासाठी सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2017 08:28 PM2017-08-10T20:28:30+5:302017-08-10T20:29:16+5:30
भारतीय हवाई दलाच्या जग्वार या लढाऊ विमानात AESA हे अत्याधुनिक रडार बसवण्यात आलं असून, त्या विमानाची यशस्वी चाचणी घेतली आहे.
नवी दिल्ली, दि. 10 - सिक्कीममधल्या डोकलाम मुद्द्यावरून चीन आणि भारतात वाद सुरू असतानाच भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्यातही वाढ झालीय. भारतीय हवाई दलाच्या जग्वार या लढाऊ विमानात AESA हे अत्याधुनिक रडार बसवण्यात आलं असून, त्या विमानाची यशस्वी चाचणी घेतली आहे. या नव्या रडारमुळे जग्वार या लढाऊ विमानांकडे दुस-या रडारला अडचणी निर्माण करत लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची क्षमता प्राप्त झालीय. बंगळुरूत हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेड(HAL)च्या विमानतळावरून जग्वार या विमानांची AESA या रडारसह यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, इज्रायलकडून विकत घेतलेल्या AESA या रडारमध्ये अनेक ठिकाणांना एकाच वेळी लक्ष्य करण्याची क्षमता आहे. दूरवरच्या भागातही AESA रडारची विमानं शत्रूला बेसावध ठेवून नेस्तनाबूत करू शकतात. विशेष म्हणजे शत्रूला AESA रडारची विमानं शोधणं अवघड असून, ही विमानं शत्रूंच्या इलाक्यात घुसून त्याच्या अड्ड्यांना उद्ध्वस्त करू शकतात. आतापर्यंत देशातील कोणत्याही लढाऊ विमानाकडे हे रडार नव्हतं. तसेच राफेल आणि बोइंगच्या नव्या लढाऊ विमानांमध्ये AESA या रडारचा वापर करण्यात येणार आहे. लढाऊ विमानांच्या मारक क्षमतेवरून चिंतेत असलेलं हवाई दल जग्वारमधील AESA या रडारमुळे सामर्थ्यवान बनलंय. यासंदर्भात हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेडनं एक विधान जारी केलं आहे. सॉलिड स्टेट डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डिंग सिस्टीम(SSDVRS), सॉलिड स्टेट फ्लाइट डेटा रेकॉर्डर(SSFDR), स्मार्ट मल्टी-फंक्शन डिस्प्ले(SMD), रेडिओ अल्टिमीटर, ऑटोपायलट यांसारख्या तंत्रज्ञानामुळे भारतीय लढाऊ विमानांना आणखी मजबुती मिळणार आहे.
भारताच्या लढाऊ विमानांसमोर चीनची विमानं तग धरू शकत नाहीत. भारताचं मिराज-2000 हे लढाऊ विमान हाताळणारे स्क्वाड्रन लीडर समीर जोशी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी ही माहिती दिली होती. भारत व चीन या दोन्ही देशांतील हवाई दलाच्या सामर्थ्याचा अभ्यास करून समीर जोशींनी एक अहवाल तयार केला होता. या अहवालात त्यांनी भारत आणि चीनच्या कमकुवत आणि मजबूत बाजू सविस्तरपणे नमूद केल्या होत्या. द ड्रॅगन क्लॉज: असेसिंग चायना पीएलएएएफ (The Dragon’s Claws: Assessing China’s PLAAF Today) या अहवालात दोन्ही देशांमधील हवाई दलाच्या सामर्थ्याची माहिती देण्यात आली होती. भारत-चीनमध्ये तिबेट आणि आसपासच्या भागात युद्ध झाल्यास भारतीय हवाई दल चीनवर नक्कीच मात करेल, असं या अहवालात म्हटलं होतं.
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्सची (पीएलएएएफ) अनेक विमानतळं तिबेटच्या पठाराच्या खूप खाली आहेत. त्यामुळे उड्डाण करत तिबेटच्या पठारावर येण्यासाठी विमानाला भरपूर मोठं उड्डाण करावं लागणार आहे. विमान तिबेटच्या पठारावर येईपर्यंत विमानाचे बरंच इंधन कमी होईल. त्यामुळे साहजिकच विमानाच्या इंजिनावर मोठा ताण पडेल. या सर्व प्रकारामुळे विमानाच्या वेगावरही मर्यादा येतील आणि लढाऊ विमानांचा वेग मंदावेल, असंही समीर जोशी म्हणाले आहेत. मात्र या बाबतीत भारत चीनपेक्षा उजवा आहे. भारताची तेजपुर, कलाईकुंडा, छाबुआ आणि हाशीमारा ही विमानतळं येथे आहेत. तिबेटच्या पठाराची उंची आणि भारताची विमानतळं असलेल्या जागांची उंची यात मोठं अंतर नाही. त्यामुळे भारताची विमानं तिबेटच्या आकाशात चिनी विमानांच्या तुलनेत कमी इंधन वापरून उंचीवरून हल्ला करण्यास सक्षम आहेत, असे समीर जोशी म्हणाले होते.