लालू यादवांनी पत्नी राबडीदेवींवर पहिल्यांदाच सोपविली मोठी जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 10:20 AM2020-03-06T10:20:13+5:302020-03-06T10:20:25+5:30
कार्यकारणीत जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. पक्षात राबडी देवी यांच्या व्यतिरिक्त शिवानंद तिवारी आणि रघुवंश प्रसाद सिंह हे देखील राष्ट्रीय उपाध्यक्ष असणार आहेत. तर अशफाक करीम यांना निवडणुकीच्या वर्षात कोषाध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे.
नवी दिल्ली - राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी पत्नी राबडीदेवी यांना पक्षाच्या उपाध्यक्षपदी नियुक्त केले. लालू यादव यांनी पहिल्यांदाच राबडीदेवी यांना पक्षाच्या कमिटीत स्थान दिले आहे. राष्ट्रीय जनता दलाची गुरुवारी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
या कार्यकारणीत विरोधीपक्षनेते तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव आणि मीसा भारती यांना सदस्य करण्यात आले आहे. तर सिवानचे माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीन यांना कार्यकारणीतून वगळण्यात आले आहे. मात्र त्याची भरपाई म्हणून शहाबुद्दीन यांची पत्नी हिना साहाब यांना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान देण्यात आले आहे.
कार्यकारणीत जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. पक्षात राबडी देवी यांच्या व्यतिरिक्त शिवानंद तिवारी आणि रघुवंश प्रसाद सिंह हे देखील राष्ट्रीय उपाध्यक्ष असणार आहेत. तर अशफाक करीम यांना निवडणुकीच्या वर्षात कोषाध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे.
बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजप आणि जनता दल युनायटेड एकत्र लढणार असून लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल पक्ष काँग्रेसच्या साथीत निवडणुकीला सामोरा जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विविध पक्षांची निवडणुकीची तयारी सुरू आहे.