भारतात जैविक इंधनावर पहिल्यांदाच उडाले विमान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 03:17 PM2018-08-27T15:17:32+5:302018-08-27T18:27:35+5:30
बायोफ्युएलवर विमान चालवून विमान संशोधनामध्ये भारताने मोठी झेप घेतली आहे.
नवी दिल्ली - जैविक इंधनावर विमान चालवून विमान संशोधनामध्ये भारताने मोठी झेप घेतली आहे. स्पाइसजेट या विमान कंपनीने बम्बार्डियर क्यू 400 या विमानाची जैविक इंधनावर डेहराडूनपासून दिल्लीपर्यंत यशस्वी चाचणी घेतली. या यशस्वी चाचणीबरोबरच जैविक इंधनावर विमानाचे यशस्वी उड्डाण करणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. तसेच जैविक इंधनावर विमान उड्डाण करणारा भारत हा पहिला विकसनशील देश ठरला आहे.
आतापर्यंत कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या विकसित देशांनीच जैविक इंधनावर विमान उड्डाण करण्याचे तंत्र विकसित केले होते. मात्र हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत हा विकसनशील देशांपैकी पहिला देश ठरला आहे. या वर्षाच्या सुरुवातील जैविक इंधनावर चालणाऱ्या पहिल्या विमानाने लॉस एन्जलिस येथून मेलबोर्नकडे उड्डाण केले होते. आम्ही पहिल्या जैविक इंधनाच्या जेटची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली आहे. या उड्डाणासाठी वापरण्यात आलेल्या इंधनापैकी 75 टक्के एव्हिएशन टर्बाइन इंधन आणि 25 टक्के जैविक इंधनाचे मिश्रण होते, असे स्पाइसजेटने सांगितले.
जैविक इंधन हे भाज्यांचे तेल, रिसायकल केलेले ग्रीस आणि जनावरांच्या चरबीपासून तयार होते. तसेच खनिज तेलाच्या जागी त्याचा वापर केला जातो. भारत खनिज तेलासाठी आयातीवर अवलंबून आहे. त्यामुळे खनिज तेलासाठीचे परावलंबित्व कमी करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नॅशनल पॉलिसी फॉर बायोफ्युएल 2018 सुरू केली होती. याअंतर्गत येत्या चार वर्षांत इथेनॉलचे उत्पादन तिप्पटीनं वाढवण्याचे लक्ष्य आहे. जर असे झाले तर तेल आयातीवरील 12 हजार कोटी रुपये वाचवता येणार आहेत.