कलम ३७० हटल्यानंतर पहिल्यांदाच बाहेरील व्यक्तीला मिळाले जम्मू-काश्मीरचे नागरिकत्व
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 11:38 AM2020-06-26T11:38:22+5:302020-06-26T11:41:52+5:30
कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर भारतातील बाहेरील राज्यातून येऊन जम्मू-काश्मीरचे नागरिकत्व मिळवण्याचा मान एका आयएएस अधिकाऱ्याला मिळाला आहे.
जम्मू - जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने गतवर्षी ऑगस्ट महिन्यात घेतला होता. त्यामुळे जम्मू-काश्मीरच्या नागरिकत्वाबाबतचे अनेक निर्बंध शिथिल झाले आहेत. दरम्यान, कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर भारतातील बाहेरील राज्यातून येऊन जम्मू-काश्मीरचे नागरिकत्व मिळवण्याचा मान एका आयएएस अधिकाऱ्याला मिळाला आहे.
बिहारमध्ये जन्मलेले आयएएस अधिकारी नवीन चौधरी यांना जम्मू-काश्मीरचे पहिले डोमिसाईल प्रमाणपत्र मिळाले आहे. नवीन चौधरी सध्या जम्मूमध्ये वास्तव्यास असून, जम्मू-काश्मीर सरकारच्या कृषी विभागात ते कमिश्नर सेक्रेटरी पदावर ते कार्यरत आहेत. दुसऱ्या राज्यातून येऊन जम्मू काश्मीरचे स्थायी नागरिक बनलेले ते पहिले अधिकारी ठरले आहेत.
नवीन चौधरी हे मुळचे बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी जम्मूमधील बाहू तहसिलदार कार्यालयात डोमिसाईल सर्टिफिकेटसाठी अर्ज केला होता. त्या अर्जाची छाननी करून बाहूचे तहसीलदार रोहित शर्मा यांनी नवीन चौधरी यांना डोमिसाईल सर्टिफिकेट प्रदान केले आहे.
नवीन चौधरी यांनी हे डोमिसाईल सर्टिफिकेट जम्मू-काश्मीर ग्रँट डोमिसाईल सर्टिफिकेट प्रोसिजर रूल्स २०२० च्या नियम ५ अंतर्गत प्रदान करण्यात आले आहे. हा कायदा हल्लीच जम्मू काश्मीरमध्ये लागू करण्यात आला होता. या कायद्याला अनेक संघटनांनी विरोध केला होता. मात्र या अधिवास कायद्याला केंद्र सरकारच्या कॅबिनेटने मंजुरी दिली होती.
केंद्र सरकारने कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये नव्या डोमिसाईल कायद्याला (दुरुस्ती) मंजुरी दिली होती. या कायद्यानुसार ज्या व्यक्तींचे १५ वर्षांपासून जम्मू काश्मीरमध्ये वास्तव्य आहे किंवा ज्या व्यक्तींनी राज्यात सात वर्षे शिक्षण घेतले आहे आणि याच राज्याच्या शाळेमधून दहावी आणि बारावीची परीक्षा दिली आहे, अशा व्यक्तींना राज्याचे नागरिकत्व मिळणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या