...म्हणून भारताच्या बहुप्रतीक्षित ‘मिशन गगनयान’च्या उड्डाणाला विलंब होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 04:27 PM2020-06-11T16:27:25+5:302020-06-11T16:28:34+5:30
या मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात असली तरी लॉकडाऊनमुळे त्याचा मुहूर्त लांबण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
नवी दिल्लीः कोरोनाचं फैलाव जगभरातल्या अनेक देशात झाला असून, त्याला थोपवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारतालाही कोरोनाचा मोठा फटका बसला असून, देशात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योगधंदे जवळपास ठप्प असून, अर्थव्यवस्थाही कोलमडली आहे. विशेष म्हणजे या लॉकडाऊनचा भारताच्या पहिल्या मानवरहित मिशन गगनयान मोहिमेला फटका बसण्याची शक्यता आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था(इस्रो) सध्या मिशन गगनयान मोहिमेवर काम करत आहे. या मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात असली तरी लॉकडाऊनमुळे त्याचा मुहूर्त लांबण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कोरोनामुळे देशात टाळेबंदी असून, अनेक उद्योगधंद्यांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. पण अजूनही कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात केंद्र सरकारला यश आलेलं नाही. आमच्याकडे अजून सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक असून, तोपर्यंत आम्ही निर्णय घेणार आहोत, असंही इस्रोनं स्पष्ट केलं आहे. मिशन गगनयानच्या उड्डाणाच्या वेळापत्रकात थोडा बदल होण्याची शक्यता आहे.
मोहिमेचं आणि सध्याच्या परिस्थितीचं संपूर्ण मूल्यमापन केल्यानंतरच गगनयानच्या उड्डाणाच्या संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. पण या मोहिमेवर काम करणाऱ्या वैज्ञानिकांच्या टीमनं अद्याप उशीर होण्यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, अशी माहिती ‘पीटीआय’नं इस्रोच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं दिली आहे. चांद्रयान मोहीम शेवटच्या टप्प्यात अयशस्वी झाल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (इस्रो) मिशन गगनयान मोहीम हाती घेतली होती. भारताची ही पहिली मानवरहित अवकाश मोहीम आहे. या मोहिमेवर काम सुरू असताना देशात लॉकडाऊन झाला. त्याचा परिणाम मिशन गगनयानवर होण्याची चिन्ह आहेत.
हेही वाचा
51 कोटी लोकांच्या खात्यात कोट्यवधी दिले, अमित शहांच्या दाव्यावर प्रकाश राज यांचा पलटवार