मेक इन इंडियातून झिकाला रोखणारी पहिली लस
By admin | Published: February 3, 2016 06:35 PM2016-02-03T18:35:04+5:302016-02-03T18:35:04+5:30
संपूर्ण जगानं धास्ती घेतलेल्या झिका व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पहिली लस बनवल्याचा दावा भारत बायोटेक या कंपनीने केला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. ३ - संपूर्ण जगानं धास्ती घेतलेल्या झिका व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पहिली लस बनवल्याचा दावा भारत बायोटेक या कंपनीने केला आहे. जन्मत: व्यंग देणा-या झिका व्हायरसला जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणिबाणी म्हणून घोषित केले आहे. मुख्यत: लॅटिन अमेरिकेत ६० वर्षांपूर्वी मूळ धरलेल्या या विषाणूने २० पेक्षा जास्त देशांमध्ये थैमान घातले असून लैंगिक संबंधातून हा विषाणू अमेरिकेतही पोचल्याचे निष्पन्न झाले आहे.
जगभरात या विषाणूला अटकाव करण्याचे प्रयत्न होत असताना भारत बायोटेकने या विषाणूला अटकाव करणा-या लशीला शोधल्याचा तसेच तिचे पेटंट घेतल्याचा दावा केला आहे.
आम्ही नऊ महिन्यांपूर्वी या लशीचं पेटंट फाइल केलं असून कदाचित अशी लस असणारी आम्ही पहिलीच कंपनी असल्याचं भारत बायोटेकचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ कृष्णा इल्ला यांनी म्हटलं आहे. या विषाणूला अटकाव करणा-या दोन लशी आम्ही बनवल्या असून प्राणी तसेच माणसांवर त्यांच्या चाचण्या सुरू असल्याचे इल्ला म्हणाले. आम्ही यासाठी भारत सरकारची मदत मागितली असून इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रीसर्च सहाय्यासाठी पुढे आली असल्याचं इल्ला म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ब्राझिल व कंबोडिया या देशांशी व्हॅक्सिन डिप्लोमसीसाठी या संशोधनाचा फायदा करावा असे आवाहनही इल्ला यांनी केले आहे.