व्यंकय्या नायडू स्वातंत्र्यानंतर जन्मलेले देशाचे पहिले उपराष्ट्रपती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2017 11:40 AM2017-08-11T11:40:25+5:302017-08-11T11:49:58+5:30
देशाचे 13 वे उपराष्ट्रपती म्हणून व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी पदाची शपथ घेतली. शपथग्रहण केल्यानंतर व्यंकय्या नायडू संसदेत आले त्यावेळी राज्यसभेत सर्वपक्षीय खासदारांनी त्यांचे अभिनंदन केले.
नवी दिल्ली, दि. 11 - देशाचे 13 वे उपराष्ट्रपती म्हणून व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी पदाची शपथ घेतली. शपथग्रहण केल्यानंतर व्यंकय्या नायडू संसदेत आले त्यावेळी राज्यसभेत सर्वपक्षीय खासदारांनी त्यांचे अभिनंदन केले. व्यंकय्या नायडू स्वातंत्र्यानंतर जन्मलेले देशाचे पहिले उपराष्ट्रपती आहेत असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. व्यंकय्या नायडू यांनी बराचकाळ राज्यसभेत काढला आहे त्यामुळे राज्यसभेचे कामकाज कसे चालते याची त्यांना माहिती आहे असे मोदी म्हणाले.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची भेट कोणी दिली असेल तर, ते व्यंकय्या नायडू आहेत. शेती, शेतकरी यांच्या समस्या त्यांना चांगल्या प्रकारे समजतात अशा शब्दात मोदींनी त्यांचे कौतुक केले. पंतप्रधान मोदींनी यावेळी व्यंकय्या यांच्या सन्मानार्थ खास शायरीचेही वाचन केले. काँग्रेसतर्फे गुलाम नबी आझाद यांनीही व्यंकय्या नायडूंचे कौतुक केले. तळागाळातून आलेल्या व्यक्तीने देशाचे उपराष्ट्रपती होणे ही मोठी बाब आहे. हेच आपल्या लोकशाहीचे वैशिष्टय आहे असे आझाद म्हणाले.
राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यंकय्या नायडू यांना उपराष्ट्रपती पदाची शपथ दिली. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील उपस्थित होते.
5 ऑगस्ट रोजी झालेल्या निवडणुकीत नायडू यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांचा पराभव केला होता. राष्ट्रपतिपदापाठोपाठ उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतही भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बाजी मारली. 5 ऑगस्ट रोजी झालेल्या निवडणुकीत एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांनी मोठया मताधिक्क्याने विजय मिळवला. पहिल्या फेरीपासून व्यंकय्या नायडू आघाडीवर होते. एकूण 771 लोकप्रतिनिधींनी मतदानाचा हक्क बजावला. व्यंकय्या नायडू यांना 516 तर, विरोधी पक्षांचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांना 244 मते मिळाली होती. तर 11 मतं बाद गेली. या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने गोपाळकृष्ण गांधी यांना मतदान केले होते.
शेतकरी कुटुंबातून आलेल्या व्यक्तीने उपराष्ट्रपती होणे हा सन्मान - व्यंकय्या नायडू
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवल्यानंतर व्यंकय्या नायडू यांनी त्यांना पाठिंबा देणा-या सर्व खासदारांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली होती. सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेला मुलगा आज देशाचा उपराष्ट्रपती होतोय हा माझा सन्मान आहे. देशाच्या संविधानाला सर्वोच्च मानून आणि माझ्या पूर्वसुरींनी ज्या परंपरा, मापदंड घालून दिलेत त्यानुसार काम करीन, अशी प्रतिक्रिया व्यंकय्या नायडू यांनी विजयानंतर दिली होती.
Amal karo aisa sadan mein,jahan se guzre tumhari nazrein, udhar se tumhe salaam aaye: PM Modi in Rajya Sabha
— ANI (@ANI) August 11, 2017