जम्मू-काश्मीरला मिळाली पहिली महिला मुख्यमंत्री

By admin | Published: April 5, 2016 12:17 AM2016-04-05T00:17:40+5:302016-04-05T00:17:40+5:30

पीडीपी अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती जम्मू-काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या. मेहबुबा यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील २१ सदस्यांसह सोमवारी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली.

First woman Chief Minister of Jammu and Kashmir received Jammu and Kashmir | जम्मू-काश्मीरला मिळाली पहिली महिला मुख्यमंत्री

जम्मू-काश्मीरला मिळाली पहिली महिला मुख्यमंत्री

Next

जम्मू : पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती जम्मू-काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या. मेहबुबा यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील २१ सदस्यांसह सोमवारी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. राज्याच्या मंत्रिमंडळात भाजपाचा वाटा मात्र वाढला आहे.
मेहबुबा यांनी उर्दुत पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यांच्यानंतर भाजपाचे निर्मलसिंग यांचा शपथविधी झाला. ते पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री असतील. मेहबुबा यांचे वडील मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर जम्मू-काश्मिरात जवळपास तीन महिन्यांपर्यंत राज्यपाल शासन राहिले. आता नवे सरकार स्थापन झाले आहे. राज्यपाल एन.एन.व्होरा यांनी मेहबुबा आणि अन्य २१ मंत्र्यांना शपथ दिली.
भाजपाला जास्त मंत्रिपदे
यावेळी मंत्रिमंडळात भाजपाची भागीदारी वाढली आहे. या पक्षाचे सहाऐवजी आठ कॅबिनेट मंत्री झाले असून तीन राज्यमंत्री आहेत. पीडीपीचे नऊ कॅबिनेट मंत्री आहेत. यापूर्वीच्या सरकारमध्ये ही संख्या ११ होती.

दरम्यान काँग्रेस पक्ष आणि पीडीपी खासदार तारिक हामिद कर्रा यांनी मात्र शपथविधी समारंभावर बहिष्कार घातला. (वृत्तसंस्था)

दुसरी मुस्लिम महिला मुख्यमंत्री
मेहबुबा मुफ्ती या जम्मू-काश्मीरच्या १३ व्या आणि देशातील दुसऱ्या मुस्लिम महिला मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी सैयदा अनवरा तैमूर यांच्या रूपात देशाला पहिल्या मुस्लिम महिला मुख्यमंत्री मिळाल्या होत्या. तैमूर या १९८० साली आसामच्या मुख्यमंत्री होत्या.

शपथविधी कार्यक्रमास मुकले केंद्रीय मंत्री
श्पथविधी समारंभाला विशेष अतिथी म्हणून आमंत्रित तीनही केंद्रीय मंत्री शपथविधी कार्यक्रमाला मुकले. केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू, हरसिमरत कौर बादल आणि जितेंद्रसिंग १५ मिनिटे उशिरा राजभवनात पोहोचले. तोपर्यत मेहबुबा आणि निर्मलसिंग यांनी शपथ घेतली होती.

उमर अब्दुल्ला यांचे प्रश्नचिन्ह
पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांच्या शपथविधी समारंभाच्या थेट प्रसारणाची बहुतांश इलेक्ट्रॉनिक माध्यमांना परवानगी नाकारण्याच्या निर्णयावर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हा एक अभूतपूर्व प्रतिबंधात्मक निर्णय असल्याची टीका त्यांनी केली. केवळ दूरदर्शन आणि एएनआय न्यूजच्या ओबी व्हॅनलाच मेहबुबा यांच्या शपथविधीच्या वृत्तांकनाची परवानगी देण्यात आली होती.

- ‘ जम्मू-काश्मीरचे नवे सरकार जनतेच्या आशाआकांक्षांच्या पूर्तेतेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील आणि राज्याच्या विकासाला एक नवा आयाम देतील अशी अपेक्षा करतो.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Web Title: First woman Chief Minister of Jammu and Kashmir received Jammu and Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.