गुपचूप उभा राहा नाहीतर...; कॉलेजमध्ये खुलेआम सुरू होती रॅगिंग, तीन तासांनी विद्यार्थ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 07:58 PM2024-11-18T19:58:55+5:302024-11-18T20:01:33+5:30
गुजरातच्या एका वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगमुळे पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Patan Medical College Ragging: गुजरातमधील पाटण जिल्ह्यातील जीएमईआरएस मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मृत्यू झालेला विद्यार्थी आणि इतर विद्यार्थ्यांची त्यांच्या वरिष्ठांनी रॅगिंग केली होती. यादरम्यान विद्यार्थ्यांनी पीडित विद्यार्थ्याला तीन तास उभे केले, त्यानंतर तो बेशुद्ध झाला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून कॉलेज प्रशासनाने १५ विद्यार्थ्यांना निलंबित केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल मेथानिया असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. याच वर्षी त्याने जीएमईआरएस मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. तो प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. वसतिगृहातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी त्याला ओळख करुन देण्याच्या नावाखाली तीन तास उभे केले. अनिलला गाणं गाण्यास आणि नृत्य करण्यास भाग पाडले. त्यानंतर अनिल बेशुद्ध झाला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. अनिलने हा सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. जबाब नोंदवल्यानंतर लगेचच त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी महाविद्यालयातील १५ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून निलंबित करण्यात आले आहे. यानंतर कॉलेजमध्ये तातडीने रॅगिंगविरोधी समितीची बैठक झाली. यामध्ये कनिष्ठ विद्यार्थ्यांचे जबाब घेण्यात आले, त्यात रॅगिंग झाल्याचे उघड झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस रुग्णालयात दाखल झाले होते. जबाब दिल्यानंतर विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. अनिलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. विद्यार्थ्याच्या मृत्यूचे कारण अंतर्गत जखमा असू शकतात, अशी भीती रुग्णालयाचे डॉ.जयेश पांचाळ यांनी व्यक्त केली.
अनिलचे कुटुंब गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यात राहते. अनिलने महिनाभरापूर्वीच धारपूर मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. त्याच्या कुटुंबियांना कॉलेजमधून फोन आला आणि सांगण्यात आले की अनिल बेशुद्ध झाला आहे, त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आम्ही पोहोचलो तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की त्यांचा मृत्यू झाला आहे. शवविच्छेदनानंतरच सत्य कळणार आहे. आम्हाला शासन आणि महाविद्यालयाकडून न्याय हवा आहे, असे अनिलच्या कुटुंबियांचे म्हणणं आहे.