‘फिटनेस’ची नुसती फॅशन नको नियमित व्यायाम करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 06:27 AM2019-08-30T06:27:44+5:302019-08-30T06:28:49+5:30
मोदींच्या हस्ते ‘फिट इंडिया’ चळवळीचा शुभारंभ
नवी दिल्ली : ‘फिटनेस’बद्दल गप्पा मारणे ही हल्ली फॅशन झाली आहे. पण त्याने काहीही लाभ होणार नाही. तंत्रज्ञानाने बदलत असलेल्या जीवनशैलीमुळे नानाविध दुर्धर व्याधी अकाली जडू लागल्या आहेत. त्यावर मात करण्यासाठी शरीराला रोज नियमित व्यायाम देऊन तंदुरुस्त राहणे हाच रामबाण उपाय असल्याने प्रत्येक नागरिकाने शारीरिक तंदुरुस्ती हा आपल्या जीवनशैलीचा भाग बनवावा, असे आवाहन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ‘फिट इंडिया’ चळवळीचा शुभारंभ केला.
मोदी यांनी गेल्या आठवड्यातील ‘मन की बात’मध्ये याचे सूतोवाच केलेच होते. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून येथील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधनांनी ‘तंदुरुस्त भारता’चा संकल्प सोडला आणि ही चळवळ लोकचळवळ म्हणून यशस्वी होऊन नागरिक स्वत:सोबतच देशाचेही आरोग्यसंपन्न भवितव्य घडवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याणमंत्री किरण रिजिजू यांच्यासोबतच यंदाच्या विविध क्रीडा पुरस्काराने सन्मानित खेळाडूही या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी औपचारिक भाषणंखेरीज भारताच्या पारंपरिक व्यायाम प्रकारांची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली. गेल्याच आठवड्यात बॅडमिंटनची जगज्जेती ठरलेल्या पी.व्ही. सिधूने यावेळी देशवासियांना ‘तंदुरुस्त भारता’ची शपथ घेण्याचे आवाहन केले.
‘फिटनेस’साठी काहीही गुंतवणूक करावी लागत नाही, पण त्याने लाभ मात्र अगणित मिळतात, हे सूत्र अधोरेखित करून मोदी यांनी याकडे लक्ष वेधले की, कोणत्याही क्षेत्रातील यशाचे शारीरिक तंदुरुस्तीशी अतूट नाते असते. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या यशात तंदुरुस्तीचा मोठा भाग असतो. ‘बॉडी फिट है तो, मार्इंड फिट है’ हे त्याचे कारण आहे, असे ते म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की, पूर्वीच्या काळी शारीरिक तंदुरुस्तीसाठी वेगळा व्यायाम करावा लागत नसे. तंदुरुस्ती हा आपल्या संस्कृतीचा व जीवनशैलीचा अविभाज्य भाग होता. दैनंदिन व्यवहारांतही थकून जाण्याएवढा व्यायाम होत असे. पण तंत्रज्ञानाने जीवनशैली पार बदलून गेली आहे. लोक व्यायानसाठी जॉगिंक करतात किंवा चालतात. पण किती पावले चाललो हे पाहण्यासाठी मोबाईल अॅपचा उपयोग करतात! एवढे तंत्रज्ञान आपल्या अंगवळणी पडले आहे. दिनचर्येत शरिराला कष्ट कमी व बसेपणा जास्त असे दैनंदिन आयुष्य होत चालले आहे. यामुळे शरीर व मन निरामय व सुदृढ ठेवण्यासाठी रोजच्या व्यवहारांखेरीज वेगळा व्यायाम करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. ठराविक व्यायामाखेरीज दमछाक करणारे खेळ खेळूनही तंदुर्स्त राहता येऊ शकेल.
आजारांनी ग्रासलेली तरुण पिढी हा मोठा चिंतेचा विषय आहे, असे सांगून मोदी म्हणाले की, उच्च रक्तदाब व मधूमेहाचे प्रमाण वाढत चालले आहे. १२ किंवा १५ वर्षाचे मूल मधुमेही असल्याचे किंवा ३० व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आल्याचेही हल्ली ऐकू येते. हे नक्कीच चिंताजनक आहे. पण मी दुर्दम्य आशावादी असल्याने मला यातूनही बाहेर पडता येईल, असा आशेचा किरण दिसतो.
पंतप्रधानांच्या हस्ते सुरु झालेली ही चळवळ पुढे नेण्यासाठी क्रीडामंत्री रिजिजू यांच्या अध्यक्षतेखाली एक २८ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. यात संबंधित सरकारी खात्यांच्या अधिकाऱ्यांसह विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधीही असतील. देशवासियांच्या सक्रिय सहकार्याने ही चळवळ नवी उंची गाठेल, असा विश्वास रिजिजू यांनी व्यक्त केला.
बॅडमिंटन, टेनिस अथवा अथवा अन्य कोणताही खेळ असो आपल्या खेळाडूंच्या कामगिरीने देशाच्या आकांक्षांना नवी भरारी मिळत आहे. त्यांनी मिळविलेली पदके हे केवळ त्यांच्या अपार कष्टाचे फलित नाही तर, ते नवभारताच्या निर्धाराचे ते प्रतिबिंब आहे.
-नरेंद्र मोदी, पंतप्रधान