पोलीस गोळीबारातच पाच शेतकऱ्यांचा मृत्यू
By Admin | Published: June 9, 2017 03:50 AM2017-06-09T03:50:31+5:302017-06-09T03:50:31+5:30
मंदसौरमध्ये पोलीस गोळीबारातच पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची कबुली गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी गुरुवारी दिली.
भोपाळ : मंदसौरमध्ये पोलीस गोळीबारातच पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची कबुली गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी गुरुवारी दिली. आधी पोलिसांनी गोळीबार केलाच नव्हता, असा दावा मध्य प्रदेश सरकार करीत होते. पण पोलीस गोळीबार करीत असल्याची चित्रफीत जाहीर झाल्यानंतर गृहमंत्र्यांना ही कबुली द्यावी लागली.
आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचा दावा सरकारने केला असला तरी पोलिसांनी बुधवारी रात्रीपासून सुमारे ७0 शेतकऱ्यांना अटक केली आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. त्यामुळे मंदसौर भागात अद्याप तणाव असून, तिथे रॅपिड अॅक्शन फोर्सच्या तुकड्या पाठवण्यात आल्या. पोलीस अधीक्षक ओ. पी. त्रिपाठी व जिल्हाधिकारी स्वतंत्रकुमार यांच्यामुळे मंदसौरमधील वातावरण बिघडले, असा शेतकऱ्यांचा आरोप होता.
अखेर त्या दोघांच्या बदलीचे आदेशही सरकारला द्यावे लागले. त्या भागातील आयपीएस व आयएएस अशा आठ अधिकाऱ्यांना अन्यत्र हलविण्यात आले आहे. त्यांनी परिस्थिती नीट हाताळली नाही, असे सरकारचेही मत असल्याचे सांगण्यात येते. पिपलीमंडीचे पोलीस निरीक्षक अनिलसिंह ठाकूर यांना
फिल्ड ड्यूटीवरून हटविण्यात आले आहे.
राज्यात रॅपिड अॅक्शन फोर्सचे १,१०० जवान तैनात करण्यात आले आहेत. स्थिती तणावपूर्ण पण नियंत्रणात असल्याचे पोलीस सांगत आहेत. डीआयजी अविनाश शर्मा पिपलीमंडीत स्वत: लक्ष ठेवून आहेत. कर्जमाफी आणि शेतमालाला रास्त भाव मिळण्याच्या मागणीसाठी येथील शेतकरी सात दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाने मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. संतप्त शेतकऱ्यांना शांत करण्यासाठी सरकारने ‘लोन सेटलमेंट स्कीम’ सुरू केली आहे. सहा लाख शेतकऱ्यांना लाभ देत ६,००० कोटी सरकारजमा करणार आहे.
>शेतकऱ्यांच्या पैशातून गोळ्यांची खरेदी?
नवी दिल्ली : कृषिकल्याण उपकरातून सरकार गोळीबाराच्या गोळ्या खरेदी करीत आहे का? यासाठीच नागरिक हा कर भरत आहेत का? असा संतप्त सवाल माकपचे महासचिव सीताराम येचुरी यांनी केला आहे. येचुरी यांनी टिष्ट्वट केले आहे की, तीन वर्षांतील कृषिमंत्रालयाच्या कामाची माहिती देण्यासाठी कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती; पण ती आता रद्द करण्यात आली आहे.
...तर उत्तर प्रदेशातही मंदसौर घडेल!
उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न लवकरात लवकर सोडवावेत नाही तर राज्यात मंंदसौरसारख्या परिस्थितीला तोंड द्यायची तयारी ठेवावी, असा इशारा राष्ट्रीय किसान मंचचे अध्यक्ष शेखर दीक्षित यांनी गुरुवारी येथे दिला.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत पीक कर्जमाफीची योजना जाहीर केली होती. त्यावर टीका करताना दीक्षित म्हणाले की, शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न आहेत तो त्यांना किमान आधारभूत किंमत मिळण्याचा व हा भाव बहुसंख्य शेतकऱ्यांना मिळतच नाही.