सहा दिवसांत पाच हार्ट अटॅक, तरीही ८१ वर्षीय वृद्धा बचावली; हृदय केवळ २५ टक्के कार्यरत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 09:20 AM2023-03-18T09:20:46+5:302023-03-18T09:21:08+5:30
महिलेला हृदयविकाराचे झटके येऊनही त्यातून ती बचावणे ही आगळी घटना असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : दिल्लीमध्ये ८१ वर्षे वयाच्या एका महिलेला सहा दिवसांत पाच हृदयविकाराचे झटके आले; पण सुदैवाने ती त्यातून बचावली आहे. या महिलेस श्वसनास त्रास होत असल्याने तिला मॅक्स रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते.
या वयोवृद्ध महिलेचे हृदय केवळ २५ टक्के कार्यरत आहे. तिला पाच हृदयविकाराचे झटके आले. त्यानंतर डॉक्टरांनी विविध उपचार प्रणाली उपयोगात आणल्या. शॉकद्वारे या महिलेच्या हृदयाचे कार्य पुन्हा सुरू करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. यासंदर्भात डॉक्टर बलबीर सिंह यांनी सांगितले की, या महिलेस पेसमेकर बसविण्यात आला आहे. त्यानंतरही तिला हृदयविकाराचे झटके आले. वृद्ध व्यक्तींमध्ये आरोग्याच्या समस्या गंभीर असतात. अशा अवस्थेत त्यांना आलेला हृदयविकाराचा झटका त्यांच्या प्राणावर बेतू शकतो. या पार्श्वभूमीवर महिलेला हृदयविकाराचे झटके येऊनही त्यातून ती बचावणे ही आगळी घटना असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले. (वृत्तसंस्था)
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"