पाचही कोविड-१९ चे मृत्यू भोपळमधील वायुगळती दुर्घटनापीडित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 06:01 AM2020-04-16T06:01:03+5:302020-04-16T06:01:13+5:30
भोपाळ : पीडितांची विशेष काळजी घेण्यासाठी एनजीओंनी दिले होते अधिकाऱ्यांना पत्र
भोपाळ : कोरोना विषाणूची (कोविड-१९) बाधा होऊन भोपाळमध्ये मरण पावलेले पाचही जण हे १९८४ मध्ये मध्यप्रदेशमध्ये घडलेल्या विषारी वायुगळती दुर्घटनेतून वाचलेले होते, असे बुधवारी अधिकाºयाने सांगितले. गॅसगळती दुर्घटनेतून वाचलेल्या लोकांना कोविड-१९ ची बाधा सामान्य व्यक्तींच्या तुलनेत फार लवकर होऊ शकते, असे वायुगळती दुर्घटनेतील पीडितांसाठी काम करीत असलेल्या काही संघटनांनी २१ मार्च रोजी संबंधित अधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळवले होते.
\कोविड-१९ ची बाधा झालेल्याच्या संपर्कात आल्यामुळेच हे पाचही जण मरण पावले, असे हा अधिकारी म्हणाला. वायुगळतीपीडितांवर उपचार करण्यासाठी बनविण्यात आलेल्या भोपाळ मेमोरिअल हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरचे रूपांतर नुकतेच कोविड-१९ च्या रुग्णांवर उपचार करणाºया केंद्रात करण्यात आले. या बदलामुळे वायुगळतीपीडितांना बराच त्रास सहन करावा लागला, असे भोपाळ ग्रुप फॉर इन्फर्मेशन अॅणञड अॅक्शन या अशासकीय संस्थेच्या सदस्य रचना धिंगरा यांनी सांगितले.
भोपाळमध्ये कोविड-१९ चा पहिला बळी ५५ वर्षांची व्यक्ती ५ एप्रिल रोजी रुग्णालयात अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे मरण पावली, असा आरोप धिंगरा यांनी केला. वायुगळतीच्या पीडित व्यक्तीलादेखील (८०) आवश्यक तेवढी वैद्यकीय सेवा दिली गेली नाही. तिचा मृत्यू ८ एप्रिल रोजी झाला. तिच्या लाळेचे नमुने ११ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह निघाले, असे रचना धिंगरा म्हणाल्या.
मृतांत कर्करोग, क्षयरोग, श्वसन विकाराचे होते रुग्ण
च्वायुगळतीतील ४० वर्षांची पीडित व्यक्ती वर्षभरापासून तोंडाच्या कर्करोगाने आजारी होती. तिचा १२ एप्रिल रोजी मृत्यू झाला आणि तिच्या लाळेचे नमुने कोविड-१९ पॉझिटिव्ह निघाले, असे त्या म्हणाल्या.
च्वायुगळतीची ५२ वर्षांची पीडित व्यक्ती क्षयरोगाने आजारी होती व तिला श्वास घेण्यास होत असलेल्या त्रासावर तातडीने उपचार मिळाले नाहीत. ही व्यक्ती नुकतीच कोविड-१९ ची पॉझिटिव्ह रुग्ण निघाली. हमिदिया हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन जात असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.
च्वायुगळती दुर्घटनेतून वाचलेल्या ज्येष्ठ पत्रकाराचा (७५) ११ एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्याच्या लाळेच्या चाचणीचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला, असे रचना धिंगरा म्हणाल्या.