‘इंडियन पॅनोरमा’त पाच मराठी चित्रपट
By admin | Published: November 4, 2015 02:41 AM2015-11-04T02:41:58+5:302015-11-04T02:41:58+5:30
पणजीत २० नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या ४६व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) उद्घाटन सिनेकलाकार अनिल कपूर यांच्या हस्ते केले जाणार आहे.
पणजी/नवी दिल्ली : पणजीत २० नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या ४६व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) उद्घाटन सिनेकलाकार अनिल कपूर यांच्या हस्ते केले जाणार आहे. यंदाही पॅनोरमा विभागात पाच मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे, तर एका लघुचित्रपटाची निवड झाली आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांच्या ‘कोर्ट’ या चित्रपटाला पॅनोरमा विभागात थेट प्रवेश मिळाला आहे, तर दिग्दर्शक तोर्शा बॅनर्जी यांचा ‘टेंडर इज द स्लाईट’ हा बंगाली लघुचित्रपट दाखविण्यात येणार आहे. पॅनोरमा विभागात दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांचा ‘द सायलेन्स’, सुबोध भावे यांचा ‘कट्यार काळजात घुसली’, सुहास भोसले यांचा ‘कोटी’ दाखविण्यात येईल.
इफ्फीत ८९ देशांतील १८७ चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहेत, तर इंडियन पॅनोरमा विभागात २६ चित्रपट आणि २१ लघुचित्रपट प्रदर्शित केले जातील. स्पेनचे दिग्दर्शक मॅन्यू ब्राउन यांच्या ‘द मॅन हु न्यू इन्फिनिटी’ या चित्रपटाने इफ्फीचा पडदा उघडणार आहे. नवी दिल्ली येथे घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. (प्रतिनिधी)