पाच दहशतवादी ठार, काश्मीरमध्ये घरात दडून बसले होते
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 07:15 AM2020-06-11T07:15:41+5:302020-06-11T07:17:18+5:30
काश्मीरमध्ये घरात दडून बसले होते; मोठा शस्त्रसाठा जप्त
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातल्या सुगू हेंदहामा या गावामध्ये बुधवारी सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले. गेल्या १५ दिवसांत सुरक्षा दलांनी २४ अतिरेक्यांचा खात्मा केला आहे. सुगू गावामध्ये एका घरात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी बुधवारी पहाटे त्या घराला वेढा घातला. ही चकमक मंगळवारची मध्यरात्र उलटल्यानंतर सुरू झाली. ती बुधवारी सकाळपर्यंत सुरू होती. आर्मी पोलीस व सीआरपीएफच्या जवानांनी या भागात नाकेबंदी केली. त्यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलाच्या जवानांनीही गोळीबार केला. या चकमकीमध्ये पाच दहशतवादी ठार झाले. ते कोणत्या दहशतवादी संघटनेचे आहेत, याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. शोपियान जिल्ह्यामध्ये गेल्या रविवारपासून झालेली ही तिसरी चकमक आहे. या दहशतवाद्यांकडून एके-४७ रायफल, दारूगोळा, ग्रेनेड, असा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या दहशतवाद्यांचे आणखी साथीदार आहेत का, ते कुठे दडून बसले असण्याची शक्यता आहे, याचाही शोध सुरक्षा दलाच्या जवानांकडून सुरू आहे.
च्देशामध्ये कोरोना साथीमुळे लॉकडाऊन सुरू आहे. जम्मू-काश्मीरमध्येही लॉकडाऊनचे निर्बंध लागू आहेत. तशा स्थितीतही पाकिस्तानच्या पाठिंब्याने दहशतवादी जम्मू-
काश्मीरमध्ये घातपाती कारवाया करीत आहेत.
15 दिवसांत काश्मीरमध्ये सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत २२ दहशतवादी ठार झाले आहेत. त्यामध्ये दहशतवादी संघटनांच्या आठ कमांडरचा समावेश आहे. या महिन्याच्या सात व आठ तारखेला रेबान व पिंजौरा येथे झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिदीनचे दोन कमांडरही मारले गेले होते.