Tirupati Stampede : मला श्वास घेता येत नव्हता, असं वाटलं की, आम्ही सर्वजण मरणार..."; तिरुपतीत नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 15:51 IST2025-01-09T15:50:47+5:302025-01-09T15:51:16+5:30
Tirupati Stampede : तिरुपती बालाजी मंदिरात मोठी दुर्घटना घडली आहे. येथे झालेल्या चेंगराचेंगरीमुळे ६ जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे ४० जण जखमी झाले, ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Tirupati Stampede : मला श्वास घेता येत नव्हता, असं वाटलं की, आम्ही सर्वजण मरणार..."; तिरुपतीत नेमकं काय घडलं?
तिरुपती बालाजी मंदिरात मोठी दुर्घटना घडली आहे. येथे झालेल्या चेंगराचेंगरीमुळे ६ जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे ४० जण जखमी झाले, ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एजन्सीनुसार, दुर्घटनेच्या प्रत्यक्षदर्शी डी व्यंकट लक्ष्मी यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीला सांगितलं की, "पाच मिनिटांसाठी मला असं वाटत होतं की, आम्ही सर्वजण मरणार आहोत. मी गेल्या २५ वर्षांपासून मंदिरात येत आहे आणि असं यापूर्वी कधीही घडलं नव्हतं. घटना घडली त्यावेळी, सहा मुलांनी मला बाजूला ओढलं आणि प्यायला पाणी दिलं"
"मी ओरडत होते, गर्दी नियंत्रणाबाहेर गेली होती"
"लोक पुढे धावत होते आणि मी जिथे उभी होते तिथे सुमारे १० लोक एकत्र पडले. मी ओरडत होती की मी पडतेय पण तरीही लोक मागून धक्का देत होते. गर्दी नियंत्रणाबाहेर गेली होती. मला बराच वेळ श्वासही घेता आला नाही. जर पोलिसांनी भाविकांना सुव्यवस्थित पद्धतीने पुढे जाऊ दिलं असतं तर ही आपत्ती टाळता आली असती. त्यावेळी लोकांना काय घडतंय ते समजत नव्हतं."
"मी सकाळी ११ वाजता मंदिरात आले आणि संध्याकाळी ७ वाजता गेट उघडला"
दुसऱ्या एका भक्ताने सांगितलं की, त्या सकाळी ११ वाजता मंदिरात आल्या होत्या आणि संध्याकाळी ७ वाजता दार उघडण्यात आलं. एका व्यक्तीने सर्वांना घाई करू नका आणि रांगेत चालायला सांगितलं, पण कोणीही ऐकत नव्हतं. पोलीस बाहेर होते, आत नव्हते. ५,००० भाविकांच्या उपस्थितीबद्दल पोलिसांना आधीच माहिती देण्यात आली होती. पोलिसांनी अचानक गेट उघडला, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली असा दावा एका भक्ताने केला आहे.
तिरुपतीच्या चेंगराचेंगरीत पत्नी हरवली, व्हायरल व्हिडिओमुळे मृत्यूची बातमी समजली
तिरुपतीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांना आपला जीव गमवावा लागला. बरेच जण जखमी झाले आहेत. याच दरम्यान एक हृदयद्रावक घटना घडली आहे. व्यंकटेश हे त्यांची पत्नी शांती आणि मुलासोबत तिरुपतीला गेले होते. वैकुंठ एकादशीनिमित्त मंदिरात भव्य दर्शन घेण्यासाठी ते खूप उत्सुक होते. मात्र त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा शेवटचा एकत्र प्रवास असेल याची त्यांना कल्पनाही नव्हती. विशेष दर्शनाचं टोकन मिळविण्यासाठी विष्णू निवासमजवळ रांगेत उभ्या असलेल्या शेकडो लोकांमध्ये व्यंकटेश यांचं कुटुंबही होतं.