पनीरसेल्वम यांच्या बाजूने आणखी पाच खासदार
By admin | Published: February 13, 2017 04:13 AM2017-02-13T04:13:46+5:302017-02-13T04:13:46+5:30
तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर रविवारी आणखी पाच खासदारांनी ओ. पनीरसेल्वम यांना पाठिंबा दिल्याने
चेन्नई : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर रविवारी आणखी पाच खासदारांनी ओ. पनीरसेल्वम यांना पाठिंबा दिल्याने शशिकला यांच्या अडचणीत भर पडली आहे. दरम्यान, ५०पैकी १० खासदार आणि ७ आमदार कार्यवाहक मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांच्या बाजूने आल्याने त्यांचे बळ वाढत आहे. दुसरीकडे शशिकला यांच्या सरकार स्थापण्याच्या दाव्यावर राजभवनातून अद्याप कोणतीही हालचाल दिसून येत नाही.
अण्णाद्रमुकचे लोकसभा सदस्य जयसिंह त्यागराज नटर्जी (तूतिकोरिन), सेंगूट्टूवन (वेल्लोर) आणि आर. पी. मरुथाराजा (पेरंबलूर), एस. राजेंद्रन (विल्लूपूरम) या चार खासदारांनी पनीरसेल्वम यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
या सर्वांनी रविवारी सकाळी पनीरसेल्वम यांची ग्रीनवेज रोड स्थित त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तर, राज्यसभा सदस्य
आर. लक्ष्मणन हेही या गटात सहभागी झाले आहेत. अण्णाद्रमुकचे चार खासदार पी. आर. सुंदरम, के. अशोक कुमार, व्ही. सत्यभामा आणि वनरोजा यांनी यापूर्वीच पनीरसेल्वम यांना पाठिंबा दिला आहे. राज्यसभा सदस्य व्ही. मैत्रेयन हेही पनीरसेल्वम यांच्या गटात आहेत. सद्यस्थितीत पनीरसेल्वम यांना ७ आमदारांचेही समर्थन आहे. तामिळनाडूच्या २३५ सदस्यीय विधानसभेत अण्णाद्रमुकचे १३५ आमदार आहेत. अभिनेतेही पनीरसेल्वम यांच्या बाजूने प्रमुख अभिनेत्यांनीही पनीरसेल्वम यांना पाठिंबा दिला आहे. यात जयललिता यांचे कट्टर समर्थक रामराजन, थियागू, अभिनेते - दिग्दर्शक आणि माजी आमदार अरुणपांडियन यांचाही सहभाग
आहे.
तामिळी नाट्यात स्वामींची उडी
राज्यपाल सी. एच. विद्यासागर राव यांना भेटल्यानंतर भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी टिष्ट्वट केले की, तामिळनाडूतील सरकारबाबत राज्यपालांनी सोमवारपर्यंत निर्णय घ्यावा अन्यथा पक्षफुटीस खतपाणी घातले जात असल्याच्या मुद्यावर न्यायालयात दाद मागण्यात येईल. पत्रकारांना धक्काबुक्की समर्थक आमदारांना कुवाथूर येथील रिसॉर्टवर भेटायला गेलेल्या शशिकला यांच्या बातमीचा
माग घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना काही समर्थकांनी धक्काबुक्की केली. काहींचे मोबाइलही जप्त केले. या निषेधार्थ पत्रकारांनी
त्या रिसॉर्टबाहेरच धरणे धरले होते.