देशात लवकरच आणखी पाच लसी; चार लसींचे उत्पादन भारतात होणार, नीती आयोगाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 07:04 AM2021-05-15T07:04:51+5:302021-05-15T07:05:45+5:30
ही माहिती नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली. ज्या आणखी पाच लसी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. नोवावॅक्स ही लस अमेरिकेत तर बाकीच्या चार लसी भारतातच तयार केल्या आहेत.
नवी दिल्ली : देशामध्ये आणखी काही महिन्यांनंतर कोविशिल्ड, कोवॅक्सिन, स्पुतनिक या लसींव्यतिरिक्त आणखी ५ कोरोना प्रतिबंधक लसी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ही माहिती नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली. ज्या आणखी पाच लसी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. नोवावॅक्स ही लस अमेरिकेत तर बाकीच्या चार लसी भारतातच तयार केल्या आहेत.
या त्या पाच लसी
१. बायो ई सबयुनिट वॅक्सिन
२. झायडस कॅडिला डीएनए
३. एसआयआय-नोवावॅक्स
४. बीबी नेझल वॅक्सिन
५. जिनोव्हा एमआरएनए
मानवी चाचण्या सुरू -
- नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, बायो ई सबयुनिटच्या मानवी चाचण्यांचा तिसरा टप्पा सुरू आहे. या लसीचे ऑगस्ट ते डिसेंबर महिन्यात ३० कोटी डोस तयार होतील. झायडस कॅडिला डीएनए वॅक्सिनचे ५ कोटी डोस, एसआयआय-नोवावॅक्सचे २० कोटी, बीबी नेझल वॅक्सिनचे १० कोटी, जिनोव्हा एमआरएनए वॅक्सिनचे ६ कोटी डोस ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान तयार होण्याची शक्यता आहे.
नोवावॅक्सची अमेरिकेत निर्मिती
पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये नोवावॅक्सचे उत्पादन केले जाईल. ती लस अमेरिकेच्या नोवावॅक्स कंपनीने तयार केली आहे. बीबी नेझल ही एकमात्रा लस असून, तिच्या मानवी चाचण्यांचा पहिला व दुसरा टप्पा सुरू आहे. पुण्याची जिनोव्हा बायोफार्मास्युटिकल्स ही कंपनी आरएनए लस विकसित करत आहे.