कौतुकास्पद! जम्मू-काश्मीरमधील ५ नवनिर्वाचित सदस्यांची चक्क संस्कृतमधून शपथ
By देवेश फडके | Published: January 1, 2021 10:19 AM2021-01-01T10:19:58+5:302021-01-01T10:23:49+5:30
जम्मू आणि काश्मीरच्या जिल्हा विकास परिषदेच्या बहुतांश नवनिर्वाचित सदस्यांनी हिंदी, उर्दू आणि इंग्रजी भाषेतून तर, जम्मू विभागातील ५ सदस्यांनी संस्कृत भाषेत शपथ घेतली.
जम्मू :जम्मू आणि काश्मीरमध्ये अलीकडेच झालेल्या जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकांत विजयी झालेल्या नवनिर्वाचित सदस्यांपैकी ५ जणांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली आहे. निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांना उपायुक्तांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
जम्मू आणि काश्मीरच्या जिल्हा विकास परिषदेच्या बहुतांश नवनिर्वाचित सदस्यांनी हिंदी, उर्दू आणि इंग्रजी भाषेतून शपथ घेतली. मात्र, जम्मू विभागातील ५ सदस्यांनी संस्कृत भाषेत शपथ घेऊन सर्वांना आश्चर्याचा गोड धक्का दिला. या पाच सदस्यांपैकी तीन सदस्य उधमपूर जिल्ह्यातील असून, सांभा आणि कठुआ भागातील एक-एक सदस्याचा यात समावेश आहे. संस्कृतमधून शपथ घेतलेल्या पाच सदस्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे समजते.
जम्मू काश्मीर विभागात निवडून आलेल्या सदस्यांपैकी सांभा जिल्ह्यातील विजयपूर-बी येथील शिल्पा दुबे, कठुआ जिल्ह्यातील हीरानगर येथील अभिनंदन शर्मा, उधमपूर जिल्ह्यातील खून येथील जूही मन्हास, लट्टी मारोठी येथील पिंकी देवी आणि जगानूं येथील परीक्षत सिंह या पाच नवनिर्वाचित सदस्यांनी थेट संस्कृत भाषेतून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. हे पाचही जण भारतीय जनता पक्षातून निवडून आले आहेत.
उधमपूरचे उपायुक्त डॉ. पीयूष सिन्हा यांनी सांगितले की, नवीन सदस्यांना त्यांच्यासाठी सहज व सोप्या असलेल्या भाषेत शपथ घेण्याची मुभा देण्यात आली होती. तीन जणांनी संस्कृत भाषेत, तर काही जणांना पारंपरिक भाषेत शपथ घेतली, असे ते म्हणाले. भाजपच्या नेतृत्वानेही या पाचही जणांचे कौतुक केले असून, संस्कृत ही देववाणी आहे. भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या जिल्हा विकास परिषदेच्या पाच सदस्यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेऊन एक आदर्श निर्माण केला आहे. पक्षाला त्यांचा अभिमान आहे. जनकल्याणाची कामे करण्यासाठी त्यांनी नेहमी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन करतो, अशा शब्दांत भाजपचे जम्मू आणि काश्मीर प्रमुख रवींद्र रैना यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली.