केरळ मंदिरातील अग्नितांडवा प्रकरणी पाच जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2016 08:35 AM2016-04-11T08:35:45+5:302016-04-11T08:38:13+5:30
केरळच्या प्रसिद्ध पुत्तिंगल देवी मंदिरातील अग्नितांडवा प्रकरणी केरळ पोलिसांनी सोमवारी सकाळी पाच जणांना अटक केली.
ऑनलाइन लोकमत
कोल्लम, दि. ११ - केरळच्या प्रसिद्ध पुत्तिंगल देवी मंदिरातील अग्नितांडवा प्रकरणी केरळ पोलिसांनी सोमवारी सकाळी पाच जणांना अटक केली. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये या पाचही जणांचा सहभाग आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास पुत्तिंगल देवी मंदिरात फटाक्यांच्या आतशबाजीमुळे भीषण आग लागली होती. या आगीमध्ये होरपळून ११२ जणांचा मृत्यू झाला तर, ४०० जण जखमी झाले.
या दुर्घटनेनंतर केरळ पोलिसांकडून मंदिराच्या पदाधिका-यांचा शोध सुरु होता. आतशबाजी आयोजित करणा-या सुरेंद्र आणि उमेश या दोघा पिता-पुत्रांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आतशबाजीला जिल्हा प्रशासनाने अधिकृतरीत्या परवानगी दिली नव्हती; मात्र वार्षिक उत्सवाच्या वेळी परंपरेनुसार आतशबाजी केली जाते. पहाटे ३.३० वाजतादरम्यान आतशबाजी बघण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. मंदिराजवळील ‘कंबपुरा’ गोदामावर आगीची ठिणगी पडली आणि स्फोट होऊन एकाचवेळी भीषण कर्णभेदी आवाजांनी परिसर दणाणून गेला.
स्फोट एवढा भीषण होता की, आवाज किमान १ किलोमीटरच्या परिसरात ऐकू आला. लगेच वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे परिसर अंधारात बुडाला असताना लोक जिवाच्या आकांताने पळू लागले. त्यातच चेंगराचेंगरी होऊन अनेक जण जखमी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.