उत्तर प्रदेशमध्ये थंडीच्या लाटेनं पाच जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 09:13 PM2018-01-04T21:13:20+5:302018-01-04T21:18:25+5:30
लखनऊ- उत्तर प्रदेशमधल्या अनेक भागांत मोठ्या प्रमाणात शीतलहरी पसरल्या आहेत. या कडाक्याच्या थंडीमुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
लखनऊ- उत्तर प्रदेशमधल्या अनेक भागांत मोठ्या प्रमाणात शीतलहरी पसरल्या आहेत. या कडाक्याच्या थंडीमुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. थंड वा-यांमुळे तापमान कमी होत असून, लोकांना सर्दी-ताप सारख्या आजारांनी ग्रासले आहेत. गेल्या 24 तासांत बदायूमध्ये थंडी वाजून दोन मुलांचा मृत्यू झाला आहे, तर आझमगडमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
उत्तर प्रदेशमधल्या अनेक भागांत मोठ्या प्रमाणात तापमान खालावत चाललं आहे. बरेली, गोरखपूर, मुरादाबादेत सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस विदर्भात थंडीची लाट कायम राहणार आहे. या भागात पुढील दोन ते तीन दिवस धुके पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे. उत्तर प्रदेशमधल्या शीत लहरींमुळे शाळा 7 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत, तर 8 जानेवारीला सकाळी 10 वाजता शाळा पुन्हा सुरळीत सुरू होणार आहेत. तर महाराष्ट्रातही जोरदार थंडीची लाट पसरली आहे. विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रही चांगलाच गारठला आहे. मुंबईकरांनाही सुखद गारवा अनुभवायला मिळत आहे. रविवारी निच्चांकी तापमान गोदाकाठी नाशिकला ९़५ अंश सेल्सिअस नोंदले गेले.
गेले काही दिवस थंडी, उकाडा, ढगाळ हवामान असा सर्व ऋतुचा अनुभव एकाच दिवसात मिळाल्यानंतर, आता थंडीचा कडाका पुन्हा वाढू लागला आहे. राज्यात विदर्भातील बहुतांश ठिकाणचे किमान तापमान १० ते ११ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाले आहे. उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढला असून, खान्देशही चांगलाच गारठला आहे. नाशिकच्या किमान तपमानातही पुन्हा कमालीची घट होण्यास सुरुवात झाली असून, पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे. पुणे शहरातील किमान तापमानही घटते आहे. शनिवारी या हंगामातील १०़१ इतके किमान तापमान होते. त्यात रविवारी किंचित वाढ होऊन ते १०.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. काही दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. त्यामुळे नववर्षांच्या सेलिब्रेशनला गुलाबी थंडीची साथ मिळणार आहे.
काश्मीर हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब, उत्तर राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश आणि कच्छ या भागात थंडीची लाट जाणवत आहे. काश्मीर खो-यात श्रीनगरमध्ये उणे २.१ इतके किमान तपमान नोंदविले गेले. पश्चिम राजस्थानमधील चुरु येथे ४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली़. बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाब येथे दाट धुक्यामुळे दृश्यमानता २५ मीटरपर्यंत कमी झाली आहे.