गोमांस बाळगल्याच्या संशयावरून फरिदाबादमध्ये पाच जणांना मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2017 05:36 PM2017-10-14T17:36:14+5:302017-10-14T20:26:03+5:30
फरिदाबादमध्ये गोमांस बाळगल्याच्या संशयावरू पाच जणांना शनिवारी अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे.
फरिदाबाद- गोमांस बाळगल्याच्या संशयावरू पाच जणांना शनिवारी फरिदाबादमध्ये अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत जबर जखमी झालेल्या या पाच जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी फरिदाबाद पोलिसांनी तक्रार दाखल केली असून पुढील कारवाई सुरू झाली आहे.
गो-तस्करी अधिनियम अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसंच पीडितांच्या तक्रारीवरूनही तक्रार दाखल केली जाणार आहे. सध्या तपास सुरू असून या पाच जणांकडे सापडलेल्या मांसाची तपासणी केली जाणार असल्याचं, फरिदाबादच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. या प्रकरणी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शनिवारी सकाळी गोरक्षा बजरंग फोर्सची काही लोक बाजडी गावाजवळ उभी होती. तेव्हा एका रिक्षेमध्ये त्यांना गोमांस असल्याचा संशय आल्यावर त्यांनी त्या दोन रिक्षेचा पाठलाग करत त्यांना थांबविलं. त्या दोन्ही रिक्षेमध्ये पाच जण होते. या दोन्ही रिक्षांमध्ये गोमांस होतं, असा आरोप या संघटनेचा आहे. गोरक्षा बजरंग फोर्सचे अध्यक्ष बिट्टू बजरंगी यांनी ही माहिती दिली आहे.
गोमांस असलेल्या दोन रिक्षा फतेहपूरवरून जुना फरिदाबादला जात होत्या. त्याचदरम्यान, तिथे असलेल्या लोकांनी गोमांस नेणाऱ्या पाच जणांना मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चार जणांना ताब्यात घेतलं आहे.
काही अज्ञातांनी आम्हाला जबर मारहाण केली. त्यांनी आम्हाला गोमाता की जय अशा घोषणा देण्यास सांगितले. याशिवाय हनुमान की जय असेही म्हणण्यास सांगितले. मात्र आम्ही त्यांना नकार दिला,’ असे आझाद यांनी सांगितलं. पोलीस घटनास्थळी आल्यानंतरही टोळक्याकडून होणारी मारहाण सुरुच होती, अशीही माहिती त्यांनी दिली. या प्रकरणी मारहाण झालेल्या आझाद, शेहझाद, शकील आणि सोनू यांच्या विरोधात पोलिसांनी हरयाणा गोवंश संरक्षण आणि गोसंवर्धन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस उपायुक्त मुजेसर राधेशाम यांनी दिली.
गोमांस वाहतूक, गोमांस सेवनाच्या मुद्यावरुन होणारे हल्ल्यांसंदर्भात महिन्याभरापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना कठोर आदेश दिले असताना फरिदाबादमधील ही घटना घडली आहे.