बेकायदेशीररीत्या भारतात राहणारे पाच रोहिंगे अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 06:55 AM2020-06-10T06:55:44+5:302020-06-10T06:56:07+5:30
जहिराबादेत करायचे मजुरी : पासपोर्ट, आधार कार्ड, मतदार ओळखपत्रे जप्त
हैदराबाद : भारतात बेकायदेशीर मार्गाने प्रवेश करणे व खोटी माहिती सादर करून आधार कार्ड व पासपोर्ट मिळविल्याच्या आरोपावरून तीन महिलांसह पाच रोहिंग्या मुस्लिमांना तेलंगणामध्ये अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. या सगळ्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांच्या तुकडीने सोमवारी जहिराबाद (जिल्हा संगारेड्डी) गावात त्यांच्या घरावर छापा घातला व २५ ते ४५ वयोगटातील पाच जणांना अटक केली.
दोन भारतीय पासपोर्ट, पाच आधार कार्ड, मतदार ओळखपत्रे जप्त करण्यात आली. हा सगळा दस्तावेज त्यांनी भारतीय नागरिक असल्याचे दाखवून मिळवला होता, असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाºयाने सांगितले. काही वर्षांपूर्वी रोहिंग्या म्यानमारमधून बांगलादेशमार्गे भारतात येऊन कोलकाता, दिल्ली आणि हैदराबादेत मुक्काम करून नंतर जहिराबादेत स्थायिक झाले. ते तेथे मजूर म्हणून काम करायचे, असे हा अधिकारी म्हणाला. या पाचही जणांनी आधार कार्ड, मतदार ओळखपत्रे मिळवली व जहिराबादेतील दोन जणांनी त्यांना २०१८ मध्ये भारतीय पासपोर्ट मिळवून देण्याचे काम केले.
भारतीय दंडसंहितेच्या संबंधित कलमान्वये त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.