उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ४ पंचतारांकित हॉटेल्स ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 04:09 AM2020-04-01T04:09:45+5:302020-04-01T04:09:54+5:30
गरज पडल्यास अशी व्यवस्था लखनौव्यतिरिक्त राज्यातील इतर शहरांध्येही केली जाईल.
लखनौ : कोरोनाबाधित रुग्णांवर सातत्याने उपचार करण्यात आघाडीवर असलेले डॉक्टर, परिचारिका आणि पॅरामेडिकल स्टाफ यांची राहण्याची सोय उत्तर प्रदेश सरकारने लखनौमधील चार पंचतारांकित हॉटेलांमध्ये केली आहे. यासाठी ही चारही हॉटेल्स सरकारने ताब्यात घेतली आहेत.या पंचतारांकित हॉटेलांमध्ये हयात रिजन्सी, लेमन ट्री, पिकडिली आणि फेअरफिल्ड बाय मॅरियट यांचा समावेश आहे. या कर्मचाºयांच्या निवासासाठी या चारही हॉटेलांचे रुपांतर क्वारंटाईन झोनमध्ये करण्यात आले आहे.
लखनौचे जिल्हा दंडाधिकारी म्हणाले की, कोरोनाबाधितांवर उपचार करणारे हे आरोग्य कर्मचारी सतत कोरोना विषाणूच्याही संपर्कात येत असतात. त्यांनाही या विषाणूचा लागण होण्याची भीती असते. त्यांच्याकडून हा संसर्ग इतरांनाही होऊ शकतो. हा धोका टाळण्यासाठी या कर्मचाºयांच्या राहण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. रूग्णालयातील ड्युटी संपल्यानंतर हे डॉक्टर, परिचारिका आणि पॅरामेडिकल कर्मचारी या चार हॉटेलांमध्ये राहतील. (वृत्तसंस्था)
अन्यत्रही सोय करणार
गरज पडल्यास अशी व्यवस्था लखनौव्यतिरिक्त राज्यातील इतर शहरांध्येही केली जाईल. तशा सूचना प्रशासनाने ठिकठिकाणी असलेली हॉटेल्स, सरकारी गेस्ट हाऊसेस, तसेच सरकारी निवासाच्या ठिकाणांना दिल्या आहेत. राज्यात सध्या
६५ कोरोनाबाधित रुग्ण आहेत.