लॉकडाऊनमधून बाहेर पडताना ५ राज्यं देशाला देणार मदतीचा हात; पण महाराष्ट्राचं स्थान काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 07:02 PM2020-06-02T19:02:36+5:302020-06-02T19:02:52+5:30
गेल्या दोन महिन्यांपासून देशाची अर्थव्यवस्था ठप्प
नवी दिल्ली: देश हळूहळू लॉकडाऊनमधून बाहेर पडू लागला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीनं मोदी सरकारनं अनलॉकची घोषणा केली आहे. यामध्ये पाच राज्यं देशासाठी मोठी कामगिरी पार पाडणार आहेत. सध्या या राज्यांचं देशाच्या जीडीपीमधलं योगदान २७ टक्के आहे. हीच पाच राज्यं आता देशाला मदतीचा हात देतील असं इलारा सिक्युरिटीजनं आपल्या अहवालात म्हटलं आहे.
केरळ, पंजाब, तमिळनाडू, हरयाणा आणि कर्नाटक राज्यांची भूमिका येत्या काही दिवसांत अतिशय महत्त्वाची असेल. या राज्यांमधील उर्जेचा वापर, वाहतूक, शेतमाल बाजारांत येण्याचं प्रमाण वाढल्याचं इलारा सिक्युरिटीच्या अर्थतज्ज्ञ गरिमा कपूर यांनी म्हटलं आहे. मात्र या यादीत महाराष्ट्र, गुजरात ही सर्वाधिक औद्योगिकरण झालेली राज्यं मागे आहेत. या राज्यांमधील कोरोना बाधितांचा आकडा जास्त असल्यानं ही राज्यं पिछाडीवर पडल्याचं विश्लेषण कपूर यांनी केलं आहे.
मोदी सरकार देशातला लॉकडाऊन टप्प्याटप्प्यानं उठवणार आहे. त्याची सुरुवात ८ जूनपासून होईल. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या भागांमधील शॉपिंग मॉल्स, रेस्टॉरंट आणि धार्मिक स्थळं सुरू होतील. अर्थचक्राला चालना देणं हीच भारतीय उद्योगांच्या दृष्टीनं सर्वात मोठी आर्थिक मदत असू शकते, असं इलारा सिक्युरिटीजनं म्हटलं आहे. पंजाब, हरयाणाच्या विजेचा वापर वाढला आहे. त्यातून मागणी वाढल्याचं अधोरेखित होत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे केजरीवालांच्याही पुढे; पण...
खबरदारी घ्या, सूचनांचं पालन करा, वादळानंतर पर्यावरणमंत्र्यांचं जनतेला आवाहन
...तर ठाकरे सरकार कोणीही वाचवू शकणार नाही; अमित शहांचं सूचक विधान