काश्मीरमध्ये पाच अतिरेक्यांना कंठस्नान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2018 06:14 AM2018-08-05T06:14:49+5:302018-08-05T06:15:07+5:30
काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यातील किलुरा गावात लपलेल्या पाच दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांच्या जवानांनी खात्मा केला आहे.
श्रीनगर : काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यातील किलुरा गावात लपलेल्या पाच दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांच्या जवानांनी खात्मा केला आहे. त्यापैकी एक दहशतवादी शुक्रवारी रात्रीच चकमकीत ठार झाला होता आणि उरलेल्या चौघांना आज, शनिवारी सकाळी ठार करण्यात आले. काल सोपोरमध्ये दोन आणि गुरुवारी पुलवामामध्ये दोन असे चार अतिरेकी लष्कराच्या कारवाईत ठार झाले होते.
शोपिया जिल्ह्यातील किलुरा गावापाशी अतिरेकी लपून बसल्याची माहिती मिळताच, जवानांनी शुक्रवार दुपारपासूनच त्यांच्या शोध सुरू केला होता. जवानांनी आपणास घेरल्याचे कळताच, अतिरेक्यांनी काल संध्याकाळी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी जोरात प्रत्युत्तर दिले. त्यात (पान ११ वर)(पान १ वरून) उमर मलिक नावाचा अतिरेकी मारला गेला. आज सकाळी जवानांनी शोध सुरू करताच, दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू
केला.
पण ते चारही अतिरेकी
सुरक्षा दलाच्या कारवाईत ठार झाले, असे काश्मीरचे पोलीसप्रमुख
एस. पी. वैद यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
>१ नागरिक ठार, १७ जखमी
सुरक्षा दलाच्या जवानांवर शोपियामध्ये आज सकाळी जमावाने जोरदार दगडफेक केली. त्यांना पांगवण्यासाठी आधी लाठीमार करण्यात आला. पण तरीही जमावाची दगडफेक सुरूच राहिल्याने जवानांनी अश्रुधूर सोडला.
पण त्याचाही उपयोग न झाल्याने जवानांनी पॅलेट गन्सचा मारा केला. त्या माऱ्यात १८ जण जखमी झाले असून, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. त्या संपूर्ण भागांत सध्या प्रचंड तणाव असून, खबरदारीचा उपाय म्हणून मोबाइलची इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच काही भागात जमावबंदीही लागू केली आहे. उमर मलिक याचा मृतदेह सकाळीच सापडला होता. त्याच्याकडील एके४७ रायफल ताब्यात घेण्यात आली आहे. तसेच अन्य चौघांचे मृतदेहही सापडले आहेत, असे पोलीसप्रमुखांनी सांगितले. सुरक्षा दलांच्या जवानांनी सुरू केलेल्या आॅपरेशन आॅलआऊट मोहिमेला यश येत आहे. गेल्या दोन दिवसांत ठार झालेले अतिरेकी हिज्बुल मुजाहिद्दिनचे होते आणि आजच्या कारवाईत लश्कर-ए-तय्यबाचे दहशतवादी मारले गेले.